पिंपरी : निगडी प्राधिकरणातील भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) फायबर ऑप्टिक ‘डक्ट’मध्ये गुदमरून मृत्यू झालेल्या दोघांबरोबर असलेले त्यांचे तीन मित्र बेपत्ता असून, त्यांचे मोबाइलही बंद आहेत. पथकांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर नेमका काय प्रकार घडला, हे स्पष्ट होईल. मृत्यूप्रकरणी जबाबदारी निश्चित होत नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनोज बाबूराव शिंदे (वय २६) आणि अमोल अशोक शिंदे (वय २०, मूळ – सिद्धेश्वर, ता. औंढा, जि. हिंगोली) अशी मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज त्याच्या भावाबरोबर नाशिक येथे केबल दुरुस्तीचे काम करत होता. तो बुधवारी सकाळी नाशिक येथून मित्र अमोलकडे आला होता. त्यांना या डक्टमध्ये उतरण्यास कोणी सांगितले, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बीएसएनएल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीच्या वायफाय व टेलिफोन केबलचे जाळे शहरभर आहे. त्यासाठी ठरावीक अंतरावर आठ बाय दहा फूट अंतराचे डक्ट तयार करण्यात आले आहेत. नवीन जोडणी टाकणे, जुनी जोडणी बंद करणे, तांत्रिक अडथळा सोडविणे अशी कामे या ‘डक्ट’मधून केली जातात. मात्र, अशी कामे करण्यापूर्वी ऑनलाइन माध्यमातून त्याचा कार्यारंभ आदेश काढला जातो, कोणत्या ठेकेदारामार्फत काम केले जाणार, हे निश्चित होते. त्यानंतर ते काम केले जाते. प्राधिकरण येथील घटनास्थळावरील ‘डक्ट’मध्ये काम करण्याबाबत ‘बीएसएनएल’कडे कोणताही कार्यारंभ आदेश नाही. त्यामुळे प्राथमिक तपासात कंपनीचा संबंध येत नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना दोन दुचाकी, टिकाव, दोन मोबाइल फोन व इतर साहित्य आढळले आहे.

मनोज आणि अमोल यांच्याबरोबर त्यांचे तीन मित्र होते. घटना घडल्यानंतर तिघेही बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पथक पाठवले आहे. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर दोन्ही कामगार ‘डक्ट’मध्ये का उतरले होते, हे स्पष्ट होईल, असे निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी सांगितले.