पिंपरी : आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणावर गोळी झाडण्यात आली. यामध्ये जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली.

याप्रकरणी स्वप्नील कांताराम जाधव (वय ३७), रोशन पिंगळे ( वय २८, दोघे रा. मधला पेठ, जाधववाडी, चिखली) या दोघांना अटक केली आहे. रवी धनाजी घोगरे (वय २६,रा. जांभुळकर चौक, जाधववाडी, चिखली) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांनी याबाबत माहिती दिली. रवी आणि स्वप्नील दोघे मित्र आहेत. रवी सोमवारी मध्यरात्री जाधववाडी येथे आला होता. तिथे स्वप्नील आणि त्याचा चालक रोशन उपस्थित होते. जुन्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणावरून रवी आणि स्वप्नील यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून स्वप्नील याने ‘तुला आज जिवंत सोडत नाही’ अशा धमकी देऊन रवीच्या दिशेने पिस्तुलातून गोळी झाडली. ही गोळी रवीच्या पोटाला लागली. गोळी पोटात अडकली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक (गुन्हे)
अमोल फडतरे तपास करीत आहेत.