पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील कुदळवाडी, चिखलीतील धार्मिक स्थळारील कारवाई दरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ५०० जणांविरूद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चिखलीतील कुदळवाडी येथील अनाधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याची अतिक्रमण निर्मुलन कारवाई सुरू असताना या कारवाईला विरोध करीत सुमारे ५०० जणांचा जमाव रस्त्यावर उतरला. त्यांनी पोलिसांच्या व्हॅनला लक्ष्य करीत पोलीसांच्या दिशेनेही अचानक दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आठ पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांसह राज्य राखीव पोलीस दलाचे १३ कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी बळाचा वापर करताच जमाव पांगला. यावेळी पोलीसांनी नाजीम नईम चौधरी (वय-२६) इजाज वकार चौधरी (वय-२६, रा. दोघे रा. जाधववाडी, चिखली) या दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्यार बाळगणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात जमावातील ५०० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कुदळवाडीत नेमके काय झाले होते?

नऊ जून रोजी कुदळवाडी, चिखलीतील मध्यरात्री मशिदी, मंदिरासह ११ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री महापालिकेचे पथक मोठा फौजफाटा घेऊन कुदळवाडीत दाखल झाले. एक ते तीन या वेळेत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये २८००१ चौरस फूट क्षेत्रफळाची ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले असून सहा जणांना किरकोळ मुकामार लागला आहे.

वर्षभरापासून कुदळवाडी रडारवर

पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये कुदळवाडीत मोठी कारवाई केली होती. ८५० एकरवर असलेल्या अनधिकृत गाेदामे, पत्राशेड, भंगार दुकानांवर हातोडा चालविला होता. सलग १५ दिवस ही कारवाई सुरू होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये चिखली, रिव्हर रेसिडन्सी येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील सात हजार २४५ चौरस मीटर भूभागावरील ६३ हजार ९७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले ३६ अनधिकृत बंगले, घरे महापालिकेने एकाच दिवसात जमीनदाेस्त केली होती. मागील महिन्यात ११ मे रोजी महापालिका प्रशासनाने कुदळवाडीतील अनधिकृत असलेल्या दोन मंदिरे आणि मशिदींवर कारवाई केली होती.