पिंपरी : ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढत असताना पिंपरी-चिंचवड सायबर सेलने मागील सव्वा वर्षांत ९० टक्के गुन्ह्यांची उकल करून १३५ आरोपींना अटक केली आहे. फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांचे पैसे परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यात पिंपरी- चिंचवड राज्यात पहिले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत हिंजवडी, तळवडे माहिती व तंत्रज्ञाननगरी (आयटी), पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण औद्योगिक वसाहती आहेत. त्यामुळे सायबर चोरट्यांनी आपला मोर्चा शहराकडे वळवला होता. शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष, समाजमाध्यमांतील व्हॉट्सॲप लिंकद्वारे फसवणूक, ऑनलाइन अटकेची भीती, अर्धवेळ नोकरीच्या अमिषाने फसवणूक, कस्टमच्या नावाने धमकी अशा विविध प्रकारांनी लाखो रुपयांची फसवणूक झाली होती.
याबाबतच्या तक्रारी सायबर पोलीस ठाणे, स्थानिक पोलिसात दाखल केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. पोलिसांकडे १ मार्च २०२४ ते ७ जून २०२५ या कालावधीत ४४ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी पोलिसांनी ९० टक्के गुन्ह्यांची उकल केली. १३५ जणांना अटक केली. कर्जतसारख्या शहराबाहेरील भागातीलही गुन्हे उघडकीस आणले आहेत. कोणत्याही लिंकवर क्लिक करताना किंवा अज्ञात व्यक्तीच्या फोनला प्रतिसाद देताना दक्ष राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सायबर चोरट्यांपासून बचाव करण्यासाठी ‘ही’ घ्या काळजी
- अनोळखी लिंक किंवा ॲप डाउनलोड करू नये.
- बँक खाते, ओटीपी पासवर्ड कोणालाही देऊ नका.
- फोन, इ-मेल, व्हॉट्सॲपवर आलेल्या आमिषांना बळी पडू नका.
- सार्वजनिक वाय-फाय वापरताना आर्थिक व्यवहार टाळावा.
- सायबर सुरक्षा अपडेट व अँटिव्हायरस वापरावा.
- फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करावी.
ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सूचना केल्या आहेत. गुन्ह्यांची उकल करण्याबरोबरच संशयितांना अटक करून कायदेशीर करवाई केली जात आहे. ही कारवाई प्रभावी ठरत असून, सायबर गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.- विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.
असे आले गुन्हे उघडकीस
‘नॅशनल सायबर क्राइम पोर्टल’वर तक्रार येताच ती पत्ता पाहून स्थानिक पोलिसांकडे वर्ग केली जाते. तक्रार येताच बँकेचे खाते गोठवले जाते. कोणत्या खात्यात पैसे वळविले आहेत, याची माहिती काढली जाते. पथके त्यावर काम करतात. तक्रार प्राप्त होताच आठ दिवसांत आरोपींचा शोध घेतला जातो. नागरिकांनी सायबर फसवणूक होताच तत्काळ तक्रार करावी. जेणेकरून लवकर खाते बंद करता येते. त्यामुळे आर्थिक फसवणूक कमी होईल,’ असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी केले.
येथे करा तक्रार
ऑनलाइन फसवणूक झाल्यास www.cybercrime.gov.in किंवा १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केले.