पिंपरी : नारी शक्ती वंदन विधेयक फेटाळल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांनी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

सभागृह नेते प्रशांत शिताेळे यांनी ‘या सरकारचे करायचे काय’, अशी घाेषणा देताच आमदार उमा खापरे यांच्यासह महापौर, नगरसेवकांनी ‘खाली डाेकं, वर पाय’ अशी जाेरदार घाेषणाबाजी सरकार विराेधात केली. सरकारविराेधात घाेषणा दिल्याचे लक्षात येताच शिताेळे यांनी पुन्हा ‘इंडि’ सरकारचे करायचे काय, अशी घाेषणा दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची एप्रिल महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी आयोजित केली होती. महापौर रवी लांडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सर्व नगरसेवक काळ्या फिती हाताला बांधून सभागृहात उपस्थित होते. ‘नारी शक्ती वंदन विधेयक फेटाळल्याने महिलांचा अवमान झाला आहे. महिलेने मिळालेल्या प्रत्येक संधीतून  स्वत:चे नेतृत्व सिद्ध केले आहे. काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाचा निषेध करीत असल्याचे’, भाजपच्या योगिता नागरगोजे यांनी म्हटले.

माजी महापौर शकुंतला धराडे यांनीही काँग्रेसचा निषेध केला. ‘महिलांसाठी आरक्षण देण्याचे विधेयक केंद्र सरकारने आणले होते. परंतु, विधेयकाला विरोध करुन काँग्रेसने महिलांचा अपमान केला आहे. विधानसभा आणि लोकसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले असते, तर मलाही आमदार होईल असे वाटले होते’, असेही त्या म्हणाल्या.
 
‘शहरातून काँग्रेस हटवली असून देशातूनही काँग्रेसला महिला हटवतील’, असे शीतल शिंदे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा जगताप म्हणाल्या, ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण शरद पवार यांनी दिले. लोकसभा, विधानसभेसाठीचे महिला आरक्षण विधेयक उशिरा मांडले. पण, उशिरा मांडले तरी आनंद होता. परंतु, विरोधकांमुळे विधेयक फेटाळले. महिलांनी राजकारणात येऊ नये असे विरोधकांना वाटेत असेल. महिला हा अपमान कदापी सहन करणार नाहीत’. ‘इंडिया आघाडीने महिला विधेयकाचे राजकारण केले. या आघाडीचा अंत महिलाच करणार आहेत. विधेयक फेटाळल्यानंतर काँग्रेसला आसुरी आनंद झाल्याचे’,  शिवसेनेच्या सुलभा उबाळे म्हणाल्या.

नगरसेविकांच्या संतप्त भावना पाहिल्यानंतर महापौर लांडगे यांनी सर्वसाधारण सभा पाच मे रोजी दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केली. अर्चना सस्ते, रिटा सानप, शर्मिला बाबर, शैलजा मोरे, वैशाली घोडेकर,  विनोद नढे, कुणाल वाव्हळकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

‘संकुलला आशा भोसले यांचे नाव द्या’

‘पिंपरी-चिंचवड शहराला आशा भोसले यांनी मोठे केले. त्यांनी शहराला नावलौकिक दिला आहे. आशा भोसले यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या निमित्ताने लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना एकत्रितपणे शहरात आणता आले. त्यांच्यामुळे शहराची सांस्कृतिक ओळख निर्माण झाली. शहरातील एखाद्या संकुलला आशा भोसले यांचे नाव देण्याची मागणी’, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी केली.