पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्याच्या सुरक्षेकरिता आणलेल्या दोन वर्षांसाठी ७५ लाख रुपयांच्या प्रस्तावावरून टीकेची झोड उठल्यानंतर स्थायी समितीने एक पाऊल मागे टाकले आहे. प्रशासनावर खापर फोडत पदाधिकाऱ्यांना सुरक्षा पुरविण्याचा विषय थेट दप्तरी दाखल केला आहे.

स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी रोजी पार पडली. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे अध्यक्षस्थानी हाेते. स्थायी समिती अध्यक्ष बारणे, सभागृह नेते प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या मागणीनुसार त्यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मर्यादित (मेस्को) यांच्याकडून दोन वर्षांसाठी नऊ सुरक्षा रक्षक घेतले जाणार हाेते.

एका सुरक्षा रक्षकाला प्रतिमहिना ३४ हजार ६५० रुपये वेतन असे सुरक्षा रक्षकांच्या दोन वर्षांच्या वेतनासाठी ७४ लाख ८५ हजार ४०० रुपये खर्चाचा विषय स्थायी समितीसमाेर मंजुरीसाठी हाेता. या उधळपट्टीवर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत जाेरदार टीका केली. वाढता विरोध पाहता प्रशासनाने विषय आणल्याचे सांगून स्थायी समितीने पदाधिकाऱ्यांसाठी सुरक्षा रक्षक नेमण्याचा विषय थेट दप्तरीच दाखल केला आहे.

महापौर तूर्तास दौऱ्यावर ठाम

अझरबैजानची राजधानी बाकू येथे १७ ते २२ दरम्यान होणाऱ्या संमेलनात १९४ देशातील अधिकारी, महापाैर सहभागी हाेणार असून हा एक अभ्यास दाैरा आहे. दौऱ्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अभ्यास दाैरेही रद्द करा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असेल, तर मी नक्कीच हा दाैरा रद्द करेल, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले. वरिष्ठांशी चर्चा करून महापौर दौऱ्याबाबत आज गुरुवारी (१४ मे) भूमिका स्पष्ट करणार आहेत.

अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहन प्रतिपूर्तीच्या प्रस्तावाचे काय होणार?

वाहन किंमत, देखभाल-दुरुस्ती, इंधन, वाहनचालकांचे वेतन व इतर दरांमध्ये वाढ झाल्याचे कारण पुढे करून महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना वाहन खर्च प्रतिपूर्तीची रक्कम वाढवून, ती दरमहा ५० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठवला आहे. याला माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आक्षेप घेतला आहे.

एका व्यक्तीसाठी महिन्याला ५० हजार रुपये म्हणजे साधारण ४५० ते ५०० लिटर इंधन वापरले जाईल. इतके इंधन वापरले तर मोटार महिन्याला नऊ हजार किलोमीटर धावू शकते. म्हणजे अधिकारी दररोज ३०० किलोमीटर प्रवास करतात का, असा सवाल त्यांनी समाजमाध्यमातील ‘एक्स’द्वारे उपस्थित केला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव १५ मे रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजूर की तहकूब करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

‘मेस्को’कडे सेवानिवृत्त सैनिक असतात. पदाधिकारी विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात. तेव्हा त्यांचे सत्कार हाेतात. त्यावेळी सेवानिवृत्त सैनिकांकडे सत्काराचे हार देणे याेग्य नाही. त्यामुळे ‘मेस्काे’चे सुरक्षा रक्षक नेमण्याचा विषय दप्तरी दाखल केला असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.