पिंपरी : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीला भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना शनिवारी (१६ मे) सकाळी सात वाजताच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ मोहननगर, बाणेर येथे घडली.

कुणाल विश्वासराव मोहिते (३८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेहुणे कुणाल मोहिते हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी भरधाव वेगातील अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालकाने जखमीला उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून पलायन केले. उपचारादरम्यान कुणाल मोहिते यांचा मृत्यू झाला. बावधन पोलीस तपास करत आहेत.

मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरी

मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोकड चोरी करण्यात आल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. ही घटना शुक्रवारी (१५ मे) सकाळी दहा ते सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून काम करत असलेल्या सोसायटीमधील महादेव मंदिरातील धातूची दानपेटी आरोपीने चोरी केली. त्यानंतर मंदिराच्या पाठीमागे नेऊन दानपेटीचा कोयंडा उचकटला. दानपेटीतील अंदाजे १५ हजार रुपयांची रोकड आरोपीने चोरी करून नेली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.

भरधाव मोटार पलटी होऊन तरुणाचा मृत्यू

भरधाव वेगातील मोटारीवरील नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (१४ मे) रात्री एक वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी पोलीस स्टेशनजवळ घडली.

आयुष विजय बनकर (२२, बनकरवस्ती, मोशी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष बनकर हा त्याच्या ताब्यातील मोटार भरधाव वेगाने चालवत होता. दरम्यान, अचानक समोर श्वान आल्याने मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर मोटार पलटी होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या अपघातात फिर्यादीचा लहान भाऊ हा गंभीर जखमी झाला. चालक आयुष बनकर यालाही गंभीर दुखापत झाली होती. उपचारादरम्यान आयुष बनकर याचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

घरफोडी करून १५ लाखांच्या दागिन्यासह रोकड चोरी

राहत्या घराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल १५ लाख २८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केले. ही घटना शुक्रवारी (१५ मे) सकाळी पावणेअकरा ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान रावेत येथे उघडकीस आली. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घराचा कोयंडा तोडून दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश करून १७८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच एक लाख ४५ हजार रुपयांची रोकड असा एकूण १५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला. रावेत पोलीस तपास करत आहेत.