पिंपरी : भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्यात सादर न करता बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिल्याप्रकरणी उत्‍तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोन घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

दहशतवाद विरोधी शाखेचे पोलीस शिपाई पुंडलिक नरसिंग पाटील यांनी शनिवारी (२८ मार्च) याबाबत उत्‍तर म्हाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन घर मालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती ऑनलाइन किंवा पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. मात्र, या घरमालकांनी आदेशाचे उल्लंघन करून माहिती लपवली. तपासणी दरम्यान त्यांच्या घरांमध्ये मेखैरुल इस्लाम आणि इद्रीस गाझी हे बांगलादेशी नागरिक विनापरवाना वास्तव्यास असल्याचे आढळले. उत्‍तर म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.

शासनाच्‍या योजनेंतर्गत कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बँक कर्ज मंजूर करून देण्याचे आणि सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची पाच लाख ४६ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरीत २०२३ ते ऑक्‍टोबर २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला.

याप्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ पासून ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेतले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज मंजुरीसाठी बँकेच्या आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, असे सांगून आरोपींनी वेळोवेळी रोख आणि बँक खात्याद्वारे रक्कम उकळली. मात्र, कोणतेही कर्ज मंजूर न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

साडेसहा लाखांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त; दोन तरुण अटकेत

म्हाळुंगे-बावधन परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखा युनिट दोनच्‍या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार ५०० रुपये किमतीचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्‍हे शाखा युनिट दोनच्‍या पथकातील पोलीस शिपाई सुखदेव सूर्यभान गावंडे यांनी शनिवारी (२८ मार्च) बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौरव रमेश कुंते (२४, बावधन, मूळ रा. बुलढाणा) आणि विवेक सुनील चौधरी (२१, बावधन, मूळ रा. जळगाव) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी सव्‍वातीन वाजताच्‍या सुमारास म्हाळुंगे येथील एका सोसायटीसमोर काही तरुण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून केलेल्या कारवाईत आरोपींच्या ताब्यातून ६० ग्रॅम वजनाचा महागडा हायड्रोपोनिक गांजा, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आणि मोबाइल जप्त करण्यात आला. बावधन पोलीस तपास करत आहेत.

दगडफेक करून दहशत माजवणारी टोळी जेरबंद

जुन्या भांडणाच्या रागातून नेहरुनगर परिसरात दगडफेक करून लोकांच्या घरांच्या काचा फोडणाऱ्या आणि कोयत्याने दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एका अल्‍पवयीन मुलावरही गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (२८ मार्च) रोजी मध्‍यरात्री सव्‍वाएक वाजताच्‍या सुमारास घडली.

याप्रकरणी पोलीस अंमलदार मयुर पंडित चौगले यांनी शनिवारी (२७ मार्च) रोजी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्वप्नील सतीश जोगदंड (१९) आणि कपिल मिलिंद जोगदंड (२३, दोन्ही रा. विठ्ठलनगर, नेहरुनगर) यांना अटक केले आहे. तसेच त्‍यांच्‍यासोबत असलेल्‍या एका अल्‍पवयीन मुलावरही गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्‍वाएक वाजताच्या सुमारास आरोपींनी एकावर दगडफेक करून परिसरात दहशत माजवली होती. डायल ११२ वरून माहिती मिळताच मार्शल पोलीस घटनास्थळी पोहोचले. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. आरोपी स्वप्नील याच्याकडे धारदार कोयता मिळून आला आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.