पिंपरी : ‘पानटपरी चालवायची असेल तर प्रत्येक महिन्याला ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, नाही तर तुझी टपरी जाळून टाकीन आणि तुला मारून टाकीन’, अशी धमकी महिलेला दिल्याची घटना भोसरीत घडली. याबाबत ५० वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सचिन डॅनियल खलसे (४०, लांडेवाडी, भोसरी) या आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची भोसरीतील लांडेवाडी येथे पानटपरी आहे. आरोपी टपरीवर आला. त्याने सिगारेट आणि पाण्याची बाटली घेतली. त्याला घेतलेल्या सिगारेट आणि पाण्याच्या बाटलीचे महिलेने पैसे मागितले असता तो चिडला. “तुला जर पानटपरी चालवायची असेल तर प्रत्येक महिन्याला ५०० रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुझी टपरी जाळून टाकीन आणि तुला मारून टाकीन” अशी धमकी त्याने दिली. आरोपीने जबरदस्तीने ५०० रुपये खंडणी स्वरूपात घेतले. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.

प्लॉट विक्रीच्या बहाण्याने ३२ लाखांची फसवणूक

जमीन विकत देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीकडून ३२ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १० जानेवारी २०२१ ते १६ जानेवारी २०२३ या कालावधीत माण (ता. मुळशी) येथे घडली. याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना माण येथील जमीन विकण्याचे कबूल केले होते. त्यासाठी बँक ट्रान्सफरद्वारे चार लाख ५३ हजार आणि रोख स्वरूपात २७ लाख ४७ हजार रुपये असे एकूण ३२ लाख रुपये घेतले. व्यवहाराबाबत साठेखत करून दिले, मात्र व्यवहार पूर्ण न झाल्यास खात्री म्हणून दिलेले ३७ लाख रुपयांचे पोस्ट डेटेड चेक बाऊन्स झाले. आरोपीने जमिनीचा ताबा दिला नाही, खरेदीखत करून दिले नाही किंवा घेतलेले पैसेही परत न देता विश्वासघात केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

घरगुती भांडणातून वहिनीच्या अंगावर ओतले गरम पाणी जुन्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने आपल्या वहिनीला बेदम मारहाण करत त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतल्याची घटना घडली आहे. ही घटना भुकुम येथे घडली. याप्रकरणी महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या घरासमोर भांडी घासत असताना आरोपी तिथे आला. पाच दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग काढून त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत धमकी दिली. आरोपीने हातातील गरम पाण्याची बादली फिर्यादीच्या पायावर ओतली आणि त्यांच्या गालावर जोरात चापट मारली. या मारहाणीमुळे फिर्यादीच्या डोळ्याखालचे हाड फॅक्चर होऊन त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.

भरधाव दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला भरधाव दुचाकीने जोरात धडक दिली. या मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (२९ जानेवारी) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निगडी येथील स्पाईन रोडवर घडली. मारुती धोंडिबा पवार (७०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सचिन मारुती पवार (३५, किरकटवाडी, सिंहगड रोड, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकी चालक संतोष दहिहांडे (३५, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील मारुती पवार हे चिकन चौक ते त्रिवेणीनगरच्या दिशेने पायी चालत जात होते. यावेळी आरोपीने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत त्यांना जोरात धडक दिली. या भीषण अपघातात मारुती पवार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

तळेगाव चौकात रिक्षाला मोटारीची धडक; तीन महिला प्रवासी जखमी बेजबाबदारपणे मोटार चालवून एका रिक्षाला जोरात धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना तळेगाव चौकात घडली. याप्रकरणी ३६ वर्षीय तरुणाने उत्तर चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आपली रिक्षा घेऊन जात असताना आरोपीने आपल्या ताब्यातील मोटार रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने चालवली. या मोटारीने रिक्षाला जोरात धडक दिली. यामध्ये रिक्षाचे नुकसान झाले आणि त्यातील तीन महिला प्रवासी जखमी झाल्या. उत्तर चाकण पोलीस तपास करत आहेत.

वाकड फाटा परिसरात एमडी ड्रग्जसह एकाला अटक

अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून त्याच्याकडून ‘एमडी’ पावडर जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवार (२९ जानेवारी) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास जगताप डेअरी जवळील वाकड फाटा बस स्टॉप येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस शिपाई वंदू गिरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एलिया उर्फ बॉक्सर प्रवीण कांबळे (२१, पिंपळे गुरव, पुणे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ बाळगून होता. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी सापळा लावून कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३९ हजार ६०० रुपये किमतीची ७.९२ ग्रॅम एमडी पावडर, प्लॅस्टिक पिशव्या, एक मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने हा पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाले असून वाकड पोलीस तपास करत आहेत.