पिंपरी : सोन्याचा झुमका चोरल्याचा खोटा आरोप करीत पैशांची मागणी आणि मानसिक छळ केल्याने एका २५ वर्षीय तरुणाने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना २७ जुलै रोजी भोसरी परिसरात घडली.विनोद पेमाराम चौधरी (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पेमाराम लसाराम चौधरी (५८, भोसरी, मुळगाव – देसुरी, पाली, राजस्थान) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिच्या कानातील सोन्याचा झुमका तरुणाच्या दुकानात पडल्याचा संशय होता. तिने विनोद चौधरी याच्याकडे ८५ हजार रुपयांची मागणी केली व पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. विनोदकडून एक लाख रुपये घेतल्यानंतरही तिने एका व्यक्तीला सोबत आणून आणखी ५५ हजार रुपयांची मागणी करत धमकी दिली. या मानसिक छळाला कंटाळून विनोदने टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

पैसे परत मागितल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर हल्ला

पूर्वी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग धरून तीन जणांनी घरात घुसून दांपत्याला चपलेने व केबलने बेदम मारहाण केली. ही घटना ७ ऑगस्ट रोजी पहाटे ४:१५ वाजण्याच्या सुमारास मेदनकरवाडीत घडली.

या प्रकरणी २६ वर्षीय तरुणाने दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांची पत्नी घरी असताना आरोपींनी बेकायदेशीरपणे प्रवेश केला. पूर्वी दिलेल्या पैशांवरून वाद घालत एका महिला आरोपीने फिर्यादीच्या पत्नीची गचांडी धरून चपलेने मारहाण केली. तसेच दुसऱ्या आरोपीने केबलने फिर्यादीच्या दोन्ही हातांवर, पायांवर, पाठीवर आणि कंबरेवर मारून गंभीर जखमी केले. दक्षिण चाकण पोलीस तपास करत आहेत.

दिघीत तळ्यात बुडून मुलाचा मृत्यू

पोहायला गेलेल्या चौदा वर्षीय मुलाचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दिघी येथे शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. अश्वित भोसले (वय १४, रा. दिघी) असे या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्वित हा दिघीतील एका शाळेत नववीत शिकत होता. शनिवारी शाळेतून घरी आल्यानंतर मित्रांसह तळ्यात पोहायला गेला. तो पाण्यात बुडाल्याने त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. दरम्यान, शेजारील नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. अश्वित याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.