पिंपरी : ऑनलाइन माध्यमातून होणाऱ्या पत्नी आणि आईचे मॉर्फ केलेले न्यूड फोटो पाठवून एका तरुणाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना १६ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ दरम्यान ऑनलाइन माध्यमातून घडली.
याबाबत एका व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी ऋषीकेश शिंदे (रा. हिंजवडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून फिर्यादी, त्यांची होणारी पत्नी आणि त्यांच्या मित्रांना फिर्यादीच्या होणाऱ्या पत्नीचे व आईचे न्यूड फोटो पाठवले.
हे फोटो काही पॉर्न वेबसाईटवर अपलोड करून तेथून काढून टाकण्यासाठी त्याने पाच लाख रुपयांची मागणी केली. या कृत्यामुळे फिर्यादीच्या कुटुंबाची बदनामी झाली आहे. रावेत पोलीस तपास करत आहेत.
तळवडेत दुकानदाराला धमकावून सात लाखांची खंडणी उकळली
रुपीनगर परिसरात एका दुकानदाराला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन सात लाख रुपये आणि सोन्याची अंगठी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ मार्च २०२५ पासून १९ एप्रिल २०२६ या कालावधीत रुपीनगर, तळवडे येथे घडली.
याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा जुना व्यवहार पूर्ण झालेला असतानाही, आरोपीने जुन्या पैशांची मागणी करत त्यांना धमकावले. पैसे न दिल्यास शॉप बंद पाडण्याची आणि शॉपमध्ये गांजा आणून ठेवून जेलमध्ये पाठवण्याची धमकी त्याने दिली.
या भीतीपोटी फिर्यादीने आरोपीला आजवर सात लाख ९ हजार ९०० रुपये रोख, एक फोन आणि ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली आहे. आता आरोपी पुन्हा १ लाख ७० हजार रुपयांची मागणी करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.
देहूफाटा परिसरात कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
लॉजवर सुरू असलेल्या देहविक्री व्यवसायावर दिघी पोलिसांनी छापा टाकून एका पिडीत महिलेची सुटका केली आहे. ही कारवाई रविवार (१९ एप्रिल) रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अरुण डामसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबाजी डुंबरे (३२, देहूफाटा, आळंदी) याला अटक केली आहे. त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी एका महिलेला कामाचे आमिष दाखवून तिला देहविक्री व्यवसायास प्रवृत्त केले. या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून ते आपली उपजीविका भागवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
गर्दीचा फायदा घेऊन महिलेची सोन्याची पोत चोरी
बापुजीबुवा मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत कापून नेल्याची घटना घडली. ही घटना शनिवार (१८ एप्रिल) रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथे घडली.
याप्रकरणी नागिनी सिद्धेश्वर तांभाळे (४०, दगडूपाटील नगर, थेरगाव) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरज सुरेश खाडे (२७, मुंजेवाडी, अहमदनगर) आणि रावसाहेब साहेबराव जाधव (५०, गणेगाव, ता. भूम धाराशिव) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला थेरगाव येथील बापुजीबुवा मंदिर परिसरात असताना आरोपींनी संगनमत करून गर्दीमध्ये त्यांच्या पर्सला कात्री लावली. पर्समधील २५ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची सोन्याची काळया मण्यांची पोत त्यांनी चोरून नेली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
पिस्तूल बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. ही कारवाई शनिवार (१८ एप्रिल) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास तापकीर मळा, काळेवाडी येथे करण्यात आली.
आशिष एकनाथ शेटे (२६, रहाटणी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल शुभम कदम यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना आरोपीने स्वतःच्या ताब्यात ५० हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे बाळगली होती. गुंडा विरोधी पथकाने सापळा रचून त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
हिंजवडीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्याला अटक
मारुंजी रोडवर सार्वजनिक रस्त्यावर गावठी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रविवार (१९ एप्रिल) रोजी रात्री ७:२० वाजण्याच्या सुमारास फलो हॉटेलसमोर करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल अजित शिंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश वासुदेव येवले (३४, कान्हेवाडी, मावळ) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना त्याने ३५ हजार रुपये किमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि १ हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस बाळगले होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून त्याची झडती घेतली असता हे शस्त्र मिळून आले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
गाडीचे हप्ते थकल्याच्या कारणावरून शेतकाऱ्याला चाकूने मारहाण
मोशी येथे गाडी अडवून हप्ते न भरल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला चाकूने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना रविवारी (१९ एप्रिल) दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास शिवाजीवाडी चौक, मोशी येथे घडली.
संदीप सोपान कड (३८, संतोष नगर, वाकी बुद्रुक) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रकाश तानाजी जाधव (२५, भोसरी), दत्ता पुरुषोत्तम कल्याणी (३०, भोसरी) आणि सुरज तुकाराम कुसाळकर (२५, चिंचवड) या तीन रिकव्हरी एजंटना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या चारचाकी गाडीतून घरी जात असताना आरोपींनी त्यांची दुचाकी आडवी लावून गाडी थांबवली. गाडीचे हप्ते का भरले नाहीत, या कारणावरून त्यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर गाडीची काच फोडून फिर्यादीच्या उजव्या दंडावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
