पिंपरी : एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कंपनीची गोपनीय माहिती आणि कच्च्या मालाचे छायाचित्र चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ ते १० एप्रिल २०२५ दरम्यान खेड तालुक्यातील उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याप्रकरणी ३२ वर्षीय व्यावसायिकाने उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका कंपनीत एक्झिक्यूटिव्ह ऑपरेटर म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याने कंपनीतील एका कर्मचाऱ्याला फोन करुन साहित्यामध्ये अडचण असल्याचे सांगितले. त्याची माहिती घेतली. त्याने परचेस विभागाच्या ईमेल मधील माहितीचे आणि साहित्याचे छायाचित्र मागवले. तो छायाचित्र त्याने स्वतःकडे ठेवले.
दरम्यान त्याने कंपनी मधून काम सोडून प्रतिस्पर्धीत कंपनीत नोकरी सुरू केली. फिर्यादी यांच्या कंपनीतून प्राप्त केलेले छायाचित्र त्याने अप्रमाणिकपणे प्रतिस्पर्धी कंपनीला दिले. हे छायाचित्र त्याने जर्मनी येथील एका कंपनीला पाठवून फिर्यादी यांच्या कंपनी प्रमाणे समान कच्च्या मटेरियलची मागणी करत फसवणूक केली. उत्तर म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
भाई असल्याचे सांगत खंडणीची मागणी
कोयत्याचा धाक दाखवत दरमहा १० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (७ एप्रिल) विजयनगर, दिघी येथे घडली.
याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोहेल अलिशेर मिर्झा (२३, विश्रांतवाडी, पुणे) आणि साकीर हुसेन आशिष चिट्टपरम (२३, मांजरी, पुणे) या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून हातात कोयता घेऊन वेअरहाऊसमध्ये शिरले आणि “आम्ही दिघीचे भाई आहोत, कंपनी चालवायची असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,” अशी धमकी दिली. त्यांनी कोयता उगारून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि वेअरहाऊसबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
नवीन रिक्षा देण्याच्या बहाण्याने फसवणूक
शोरूमची बनावट पावती देऊन आणि विनापरवाना रिक्षा देऊन एका चालकाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना वाकड येथे घडली.
याबाबत ४३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला नवीन अल्टो रिक्षा देतो असे सांगून बुकिंगचे ५ हजार आणि रोख १ लाख रुपये घेतले. त्यानंतर कोणतीही कागदपत्रे, विमा किंवा पासिंग नसलेली रिक्षा देऊन फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादीने आक्षेप घेतला असता आरोपीने रिक्षा शोरूमला जमा करून घेतली, मात्र पैसे परत न देता विश्वासघात करत फिर्यादी आणि शोरूम ची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
पुणे-मुंबई हायवेवर मोटारीचा अपघात; १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
चालकाच्या निष्काळजीपणामुळे मोटारीने पुढच्या वाहनाला आणि दुभाजकाला धडक दिल्याने एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (८ एप्रिल) रात्री ३ वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई हायवेवर शिरगाव हद्दीत घडला.
दर्शन अभिजित शहा (१५, कडेगाव, जि. सांगली) या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटार चालविणाऱ्या दर्शनच्या भावाविरोधात शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोटार वेगाने घेऊन जात असताना त्याचे लक्ष विचलित झाले. मोटारीने समोरच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर मोटार उजव्या बाजूच्या दुभाजकाला जाऊन धडकली. या भीषण अपघातात दर्शनला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. फिर्यादी आणि आरोपी देखील जखमी झाले आहेत. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
