पिंपरी : चिखलीतील चिंचेचा मळा परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून अवैधरित्या गॅस रिफिलिंग करून साठा केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी (२५ मार्च )रोजी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास करण्यात आली.

रोहित प्रभाकर शिंदे (२७, मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी गुन्‍हे शाखेच्‍या मालमत्‍ता विरोधी पथकातील पोलीस अंमलदार समीर लक्ष्मण रासकर यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास आरोपीने कोणतीही सुरक्षितता न पाळता घरगुती गॅस सिलिंडरमधून इतर सिलिंडरमध्ये गॅस काढून साठा केला होता. यावेळी १३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्‍ये गॅस सिलिंडरच्‍या रिकाम्‍या व भरलेल्‍या टाक्‍या, वजन काटा जप्‍त करण्‍यात आला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

दापोडीत तरुणांवर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा

दापोडीत जुन्या वादाच्या कारणावरून सहा जणांनी एकत्र येत दोन तरुणांवर लोखंडी रॉड, बांबू व बिअरच्या बाटल्यांनी हल्ला करून जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. ही घटना बुधवारी (दि. २५ मार्च) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

नन्या उर्फ जयप्रकाश पंडीत (२२), संदेश गजभिव (२३), रोहन बनसोडे (२३), डेविड उर्फ मोन्या पाटोळे (२२), प्रथमेश चलवारे (२४, सर्व रा. जयभीम नगर, दापोडी) यांना अटक करण्यात आली आहे. महेश पवन गुळवे (२२, दापोडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी याबाबत दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसांत संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमविला. त्‍यानंतर फिर्यादी व त्याचा मित्र यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी खाली पाडून गळा दाबण्याचा प्रयत्न केला तसेच सिमेंट गट्टू, लोखंडी रॉड, बांबू व बाटल्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करीत जिवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. तसेच आणखी दोघांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणाचा तपास दापोडी पोलीस करत आहेत.

मोटार चालकाने गॅस सिलिंडर फेकून मारला

म्हाळुंगे येथील निघोजे परिसरात भरधाव कार चालविणाऱ्या चालकाने वादातून एका व्यक्तीवर गॅस सिलिंडर फेकून मारला. तसेच दगडाने मारहाण केली. ही घटना घटना बुधवारी (२५ मार्च) रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.

याप्रकरणी ३० वर्षीय तरुणाने दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने भरधाव वेगाने मोटार चालवत फिर्यादीच्या दिशेने येताच फिर्यादीने बाजूला उडी मारली. त्यानंतर वाद झाल्याने आरोपीने संतापून जवळच्‍या गॅरेजमधील पाच किलो वजनाचा गॅस सिलिंडर फेकून मारला तसेच दगडाने कपाळावर मारून करून जखमी केले. तसेच बुक्क्यांनी मारहाण करत धमकीही दिली. तपास दक्षिण म्हाळुंगे पोलीस करत आहेत.

अल्‍पवयीन चोरट्याने हिसकावली साडेचार लाखांची सोनसाखळी

म्हाळुंगे येथील घाटे वस्ती परिसरात दुचाकीवरून आलेल्या अल्‍पवयीन चोरट्याने एका व्यक्तीच्या गळ्यातील सुमारे चार लाख ४४ हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी खेचून नेली. ही घटना गुरुवारी (२६ मार्च) रोजी दुपारी पावणे चार वाजताच्‍या सुमारास घडली.

पोलिसांनी अल्‍पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने उत्‍तर म्हाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुचाकीवरुन जात होते. ते म्हाळुंगे येथील घाटे वस्ती परिसरात आले असता आरोपीने मागून दुचाकीवरून येत फिर्यादी यांच्‍या गळ्यातील ३४.९८० ग्रॅम वजनाची चार लाख ४४ हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी जबरदस्तीने खेचून पळ काढला. या प्रकरणाचा तपास उत्‍तर म्हाळुंगे पोलीस करत आहेत.

चिखलीत गांजा विक्री प्रकरणी तरुणाला अटक

चिखलीतील जाधववाडी परिसरात गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्‍यांच्‍याकडून१० हजार ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्‍त करण्‍यात आला. ही कारवाई बुधवारी (२५ मार्च) रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास करण्यात आली.

अविनाश धनाजी गोरे (१९, जाधववाडी, चिखली) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.  या प्रकरणी गुन्‍हे शाखेच्‍या अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांनी चिखली पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास आरोपी अविनाश गोरे याच्‍याकडून २१० ग्रॅम वजनाचा १० हजार ५०० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. त्‍याच्‍याकडे मिळालेल्‍या गांजाबाबत चौकशी केली सअता त्‍याने तो गांजा दुसऱ्या आरोपीकडून विक्रीसाठी आणला असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले. चिखली पोलीस तपास करत आहेत.