पिंपरी : घरातील लाईट बंद करून झोपण्यास सांगितल्याने मद्यपान करुन आलेल्या पतीने आपली पत्नी आणि मुलाला मारहाण करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करित त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (१० मे) तळवडेत घडली. या प्रकरणी मानसी सुभाष उत्तेकर (४०, रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभाष केशव उत्तेकर (४५, रुपीनगर, तळवडे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मानसी, त्यांचा मुलगा आणि पती सुभाष हे तिघे घरात झोपले होते. सुभाष हा मद्यपान करुन आला होता. तो शिवीगाळ करत असल्याने फिर्यादी यांनी घरातील लाईट बंद करून त्याला झोपण्यास सांगितले. या कारणावरून सुभाष याने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. फिर्यादी आणि मुलगा या दोघांवर धारदार शस्त्राने वार करित दोघांना गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.
मांजरींना खायला देण्यासाठी चावी दिली अन् दागिने लांबविले
मांजरींना खायला देण्यासाठी एका व्यक्तीकडे चावी देऊन महिला गावी गेली. त्या महिलेच्या घरातील साडेचार लाखांचे दागिने व्यक्तीने चोरून नेले. ही घटना ६ ते १० मे या कालावधीत गणेशनगर बोपखेल येथे घडली. याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मूळचा पंजाबचा असलेल्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला कोल्हापूर येथे गावी जायचे होते. त्यांच्या घरात मांजरी आहेत. त्यांना खाऊ घालण्यासाठी त्यांनी त्यांच्या ओळखीचा व्यक्ती आरोपीकडे घराची चावी दिली. महिला गावी गेल्यानंतर दोन दिवसांनी आरोपीने त्यांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच ‘तुला बघ माझ्या मागे पंजाबपर्यंत यायला लावतो’, अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीच्या घरातून चार लाख ४७ हजार रुपये किमतीचे १४.९ तोळे सोन्याचे दागिने घरातील कपाटातून चोरून नेले. दिघी पोलीस तपास करत आहेत.
दापोडीत जुगार अड्ड्यावर कारवाई
दापोडी मधील रेल्वे स्टेशन जवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर दापोडी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (१० मे) सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर जाधव यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दापोडी रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूला असलेल्या एका पत्रा शेड मध्ये जुगार खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २४ हजार ५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांवर कारवाई
बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दिघी पोलिसांनी तिघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. ही कारवाई शनिवारी (९ मे) दुपारी साठे वस्ती, चऱ्होली येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल बाबाजी जाधव यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साठे वस्ती चऱ्होली येथील वाघेश्वर विद्यालयाजवळ तिघेजण कोयता घेऊन आले असल्याची माहिती दिघी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८०० रुपये किमतीचे तीन कोयते जप्त केले आहेत. दिघी पोलीस तपास करत आहेत.
चिंचवडमध्ये झाडाखाली जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई
चिंचवड येथील रामनगर भागात चिंचेच्या झाडाखाली पैसे लावून जुगार खेळणाऱ्या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई रविवार (१० मे) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समीर ढवळे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना नोटीस देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगरमधील झाडाखाली आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तिथे छापा टाकला असता आरोपींकडे जुगाराचे साहित्य आणि १ हजार ६९० रुपये रोख मिळून आले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
