पिंपरी : तळेगाव दाभाडे येथे घरात कोणी नसल्याची संधी साधून चुलत भावाने कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (११ मे), सकाळी ६.०० ते दुपारी २.०० वाजण्याच्या दरम्यान मनोहरनगर, तळेगाव दाभाडे येथे घडली.
याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कर्नाटक राज्यातील भावा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी कामावर गेले असताना त्यांचा चुलत भाऊ घरी आला होता. त्याने घरातील बेडरुममध्ये असलेल्या उघड्या लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून एक लाख २९ हजार ५०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणावर हल्ला
बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून भोसरी येथे एका तरुणाला चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (१० मे) रात्री पावणे बाराच्या सुमारास भोसरी येथे घडली.
याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा घरासमोर बसलेला असताना आरोपी तिथे आले. एका आरोपीच्या बहिणीशी फिर्यादीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. या रागातून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करित लाथा-बुक्क्यांनी, दांडक्याने आणि तेथे पडलेल्या दगडाने मारहाण करून जखमी केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
अपघातातील जखमीला मदत करण्यास गेलेल्या तरुणाला मारहाण
म्हाळुंगे येथे अपघातात जखमी झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल करून परतलेल्या तरुणाला आणि त्याच्या भावाला दगड आणि काठीने बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (११ मे) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
याबाबत ३६ वर्षीय तरुणाने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी अपघातात जखमी झालेल्या महिलेला गुन्हा दाखल झालेल्या एका आरोपीच्या मदतीने रुग्णालयात नेले होते. त्यानंतर पुन्हा घटनास्थळी आल्यावर आरोपीने विनाकारण शिवीगाळ सुरू केली. फिर्यादी जीव वाचवण्यासाठी कंपनीत पळाले असता, आरोपींनी तिथे जाऊन त्यांना ओढत बाहेर काढले. आरोपीने दगडाने फिर्यादीच्या डोळ्याखाली मारले, तर त्याच्या एका साथीदाराने लाकडी काठीने पायावर मारून जखमी केले. म्हाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
वाईन शॉप बाहेर दोघांवर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला
वाईन शॉपमधून मद्याचे पार्सल घेऊन बाहेर येत असताना रस्ता मागितल्याच्या कारणावरून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर स्क्रू-ड्रायव्हरने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (१० मे) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास माण येथे घडली.
याबाबत ३८ वर्षीय तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र वाईन शॉपबाहेर येत असताना वाटेत आरोपी उभे होते. फिर्यादीने “मला बाहेर जायचे आहे, जागा द्या” असे म्हटल्याचा आरोपींना राग आला. यावरून त्यांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्यानंतर टेस्टर्स स्क्रू-ड्रायव्हरने फिर्यादीच्या डोक्यात आणि तोंडावर मारून जखमी केले, तसेच मित्राच्या डोक्यातही वार केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
पीएमटी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
आळंदी येथे पीएमटी बस पार्क करत असताना बसच्या चाकाखाली चिरडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (११ मे) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पीएमटी बस स्टॉप, आळंदी येथे घडली.
या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालकाने आळंदी पीएमटी स्टॉपवर बस पार्क करत असताना परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे बस चालवली. यावेळी बसच्या उजव्या बाजूच्या मागील चाकाखाली अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एक अनोळखी पुरुष आला. बसचे चाक डोक्यावरून गेल्याने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्तीने जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली होती. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
जमीन मोजणीच्या वादातून एकाला बेदम मारहाण
मावळ तालुक्यात जमीन मोजणीच्या कारणावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लाठी आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना सोमवारी (४ मे) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बेबड ओहळ येथे घडली. याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मालकीच्या जमिनीच्या मोजणीवरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपींनी अंगावर धावून जात हाताने, काठीने आणि दगडाने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीच्या नाकाचे हाड आणि पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या आई-वडील आणि काका-काकींना जीवे मारण्याची धमकी दिली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
