पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गावठी कट्टे, पिस्तुल बाळगणाऱ्या चार जणांना वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये गावठी कट्टे, पिस्तुल येतात कुठून, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

चिखलीत पिस्तुलसह एकाला अटक

चिखली परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणार्‍या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

विश्वजीत सर्जेराव मंडले (वय २६ वर्षे, रा. सानेचौक, चिखली, मूळ रा. सातारा) याला अटक केली आहे. चिखली पोलीस ठाण्यातील हवालदार किरण बबन काटकर फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात २९ एप्रिल ते १२ मे या कालावधीत शस्त्रबंदी आदेश लागू आहेत. आरोपी रात्रीच्या सुमारास पिस्तुल आणि दोन काडतूस घेऊन फिरताना आढळला. त्याच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले असून भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.

तडीपार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला एक सराईत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी मावळ तालुक्यातील वराळे येथे करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई रमेश सोमीनाथ घुले यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिल जगन जाधव (वय २६ वर्षे, रा. वराळे, मावळ) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव याला सप्टेंबर २०२५ मध्ये संपूर्ण पुणे जिल्हा आणि खालापूर तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही तो वराळे-आंबी रोड परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्र घेऊन फिरताना मिळून आला. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस हवालदार मरागजे करत आहेत.

पिस्तुलसह विद्यार्थ्यास अटक

औंध जिल्हा रुग्णालयाजवळ पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणार्‍या एका १९ वर्षीय विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (३० एप्रिल) रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.

पोलीस हवालदार आशिष ज्ञानदेव बनकर यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अर्थव सोपान मारणे (वय १९, रा. आंबेगाव पठार, कात्रज) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील पॉवर हाऊसजवळ आरोपी ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस बाळगताना आढळला. शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही त्याने या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर शस्त्र अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करत आहेत.

आळंदीच्या इंद्रायणी घाटावर पिस्तुलसह तरुणाला अटक

आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर बेकायदेशीररीत्या देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (३० एप्रिल) रोजी रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

याप्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब विष्णू खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तानाजी माणिक शिंदे (वय २८, रा. आळंदी, मूळ रा. केज, जि. बीड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीच्या इंद्रायणी नदी घाटावर नवीन पुलाखाली आरोपी संशयास्पदरीत्या मिळून आला. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ४६ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतूस आढळून आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही त्याने विनापरवाना हे शस्त्र बाळगल्याने त्याच्यावर शस्त्र अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. आळंदी पोलीस ठाण्‍यातील हवालदार दोडके तपास करत आहेत

गुंतवणूकीच्या बहाण्याने साडेबावीस लाखांची फसवणूक

गुंतवणूकीवर अवघ्या दहा दिवसांत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेबावीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ६ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडली.

याप्रकरणी एका महिला फिर्यादीने गुरुवारी (३० एप्रिल) रोजी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी कुणाल काशिनाथ साबळे (वय ३६, रा. जुनी सांगवी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या तीन कंपन्या असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता. फिर्यादीने वेळोवेळी २२ लाख ५० हजार रुपये आरोपीच्या खात्यात ट्रान्सफर केले. परताव्यासाठी आरोपीने दिलेला २५ लाखांचा चेक बँक खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक शिर्के तपास करत आहेत.

.