पिंपरी : ऑनलाइन गेमिंगसाठी बँक खाती आणि सिम कार्डचा गैरवापर करून एका तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना साईनगर, मामुर्डी येथे घडली.
या प्रकरणात २१ वर्षीय तरुणाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओमकार अभिजीत कदम (वय २२, साईनगर, मामुर्डी) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी ओमकार याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना विविध बँकांमध्ये खाती उघडण्यास सांगितले. प्रत्येक खात्यामागे दहा हजार रुपये देण्याचे आमिष त्याने दाखवले होते. मात्र, कोणतीही रक्कम न देता आरोपीने फिर्यादीच्या नावे सिम कार्ड आणि बँक खाती मिळवली. ही खाती आणि सिम कार्ड इतर दोन आरोपींना ऑनलाइन गेमिंगसाठी वापरण्यास देऊन फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. पोलिसांनी ओमकार कदम याला अटक केली असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
हॉटेल व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने ४२ लाखांना गंडा
हॉटेल व्यवसायात भागीदारी करून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना च-होली येथे घडली.
याबाबत ४७ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला आणि वारजे येथील एका हॉटेलमध्ये गुंतवणुकीस त्यांना प्रवृत्त केले. फिर्यादीने कर्ज काढून ४२ लाख रुपये गुंतवले. सुरुवातीचे काही महिने कर्जाचे हप्ते भरल्यानंतर आरोपींनी पैसे देणे बंद केले. तसेच फिर्यादीला विश्वासात न घेता ते हॉटेल दुसऱ्या व्यक्तीला चालवण्यास देऊन त्यातून आलेली रक्कमही स्वतःकडे ठेवत फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.
वडिलांना शिवीगाळ का करतो असे विचारल्याने तरुणाला बेदम मारहाण
कौटुंबिक वादातून वडिलांना शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारल्याने एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना हेद्रुज, ता. खेड येथे घडली.
याप्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील त्यांच्या आईला शिवीगाळ करत असताना आरोपींनी गैरसमज करून घेतला. फिर्यादी यांचे वडील आरोपींना शिवीगाळ करत असल्याचा गैरसमज आरोपींना झाला. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाकडी दांडके आणि लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाले असून उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
मद्य पिणाऱ्या व्यक्तीला घरी पाठवल्याच्या रागातून तरुणाचे डोके फोडले
नशेत असलेल्या व्यक्तीला गाडीवर बसवून घरी पाठवल्याच्या कारणावरून दोन भावांनी मिळून एका तरुणाला मारहाण करत त्याचे डोके फोडले. ही घटना येलवाडी येथे घडली.
याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चायनीज खाण्यासाठी गेले असताना तिथे आरोपी मद्य प्राशन करत होते. त्यापैकी एकाला जास्त नशा झाल्याने फिर्यादीने त्याला गाडीवर बसवून घरी पाठवले. याचा राग आल्याने इतर आरोपींनी फिर्यादीला गाठून मारहाण केली. यावेळी फिर्यादीच्या डोक्यात पाठीमागून दगड मारून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले, तसेच त्यांच्या मेव्हण्यालाही लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तिघांना अटक केली. याच्या परस्पर विरोधात २६ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.
रहाटणी येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचे मंगळसूत्र चोरले
सकाळी फिरायला गेलेल्या दांपत्याला अडवून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना रहाटणी येथील नखाते चौकाजवळ घडली. ही घटना मंगळवारी (३ फेब्रुवारी) सकाळी सहा वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका चोराला अटक केली आहे.
या प्रकरणी आत्माराम आबू माने (६४, रहाटणी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय नरसिंह लूनक्का (२९, नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने आणि त्यांची पत्नी सकाळी चालण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने त्यांना गाठले. आरोपीने फिर्यादीच्या पत्नीला मारहाण केली आणि त्यांच्या गळ्यातील तीन लाख ७९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
शहरातून तडीपार असतानाही बेकायदेशीरपणे वावरणाऱ्या आणि कोयता बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका गुंडाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी जांबेगाव येथे करण्यात आली.
पोलीस शिपाई कारभारी पालवे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुन्ना उर्फ जुबेर मौल्ला अत्तार (३६, जांबेगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुन्ना याला पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे लोखंडी कोयता मिळून आला असून तो लोकांमध्ये दहशत निर्माण करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

