पिंपरी : मालमत्तेच्या वादातून लोणावळ्यात ८३ वर्षीय आजोबाने नातवाचा गोळी झाडून खून केल्याची घटना ताजी असतानाच नवी सांगवीत मालमत्तेतील हिस्सा देत नसल्याने सावत्र नातवाने आजीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सराइत गुन्हेगार असलेल्या नातवाने आजीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केला आणि त्यानंतर स्वत: सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाला.

ही घटना शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.मंगल बाबूराव शिंगोरे (वय ६०, रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. ओंकार किसन शिंगोरे (वय ३०) असे आरोपी नातवाचे नाव आहे. या प्रकरणी मंगल यांच्या मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी ओंकार हा सराइत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपी ओंकार हा मंगल शिंगोरे यांच्या सावत्र मुलाचा मुलगा आहे. तो पिंपळे गुरव येथे राहत होता. मंगल यांच्या नावाने नवी सांगवी येथील राहती इमारत आहे. या मालमत्तेतील हिस्सा ओंकार याला पाहिजे होता. मात्र, मंगल या हिस्सा देत नसल्याचा राग त्याच्या मनात होता. मंगल या शुक्रवारी सकाळी त्यांच्या घरी असताना ओंकार तिथे आला. त्याने मालमत्तेतील हिस्सा देत नसल्याच्या रागातून मंगल यांच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यात मंगल यांचा मृत्यू झाला, असे सहायक पोलीस आयुक्त मनिषा कदम यांनी सांगितले. आजीचा खून केल्यानंतर ओंकार स्वत:हून सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आजीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी घटनेची खातरजमा करत ओंकार याला ताब्यात घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी सांगितले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत. किवळेत ट्रकच्या धडकेत वाहतूक पोलीस गंभीर जखमी वाहतूक नियमन करत असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने पोलीस हवालदार गंभीर जखमी झाल्याची घटना देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किवळे येथे घडली.दत्तात्रय शेंडे असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय जगताप यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक लक्ष्मण ताकभाते ( वय ४२, कात्रज, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय शेंडे हे देहूरोड वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. ते आणि फिर्यादी जगताप हे किवळे येथील कृष्णा चौकात वाहतूक नियमन करत होते. आरोपीने बेदरकारपणे आणि हयगयीने ट्रक चालवला. त्याने पोलीस हवालदार शेंडे यांना पाठीमागून धडक देऊन खाली पाडले आणि ट्रकचे मागील चाक त्यांच्या डाव्या पायावरून घालवले. यामुळे शेंडे यांच्या पायाच्या टाचेला आणि घोट्याला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. देहूरोड पोलीस तपास करित आहेत.

कासारवाडीत मोटारीच्या धडकेत वृद्ध जखमीभरधाव वेगात आलेल्या मोटारीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ७३ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना कासारवाडी येथे घडली आहे. वसंत श्रीपती दसगुडे (७३) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांच्या मुलाने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसगुडे हे पुण्यावरून भोसरीच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. कासारवाडी पुलावर आले असता पाठीमागून आलेल्या मोटार चालकाने त्यांच्या दुचाकीला उजवीकडून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, दोन्ही पायांना, हाताला व खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. दापोडी पोलीस तपास करित आहेत.