पिंपरी : लग्नापूर्वीच्या नावाचा आणि वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करून पत्नीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ या हिंजवडी येथे घडली.या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने पत्नी फिर्यादीचा विश्वास संपादन करून मॉरगेज लोनसाठी त्यांच्या लग्नापूर्वीच्या नावाचा वापर केला. पत्नीला कोणतीही कल्पना न देता त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांना सह-भागीदार बनवले. आरोपीने बँकेच्या कागदपत्रांवर खोटी सही करून स्वतःच्या फायद्यासाठी ४१ लाख २५ हजार ७८८ रुपयांचे कर्ज घेतले. याबाबत विचारणा केली असता आरोपीने पत्नीला शिवीगाळ केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
दारू पिण्यास मज्जाव केल्याने महिलेवर तव्याने हल्ला
दारू पिऊ नका असे सांगितल्याचा राग आल्याने एका व्यक्तीने आपल्या नातेवाईक महिलेला मारहाण करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (२८ मे) रात्री १२:३० वाजेच्या सुमारास किवळे रोड येथे घडली.पोलिसांनी अनिल सुमंत माने (५०, कातळेवस्ती, किवळे) याला अटक केली आहे. या प्रकरणात अजय चिंचवडे (४९, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नातेवाईक महिलेने आरोपीला दारू पिऊ नका असे म्हटले. याचा राग आल्याने आरोपीने तिला शिवीगाळ केली आणि लोखंडी तव्याने तिच्या डाव्या भुवईवर वार केला. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून रावेत पोलीस तपास करत आहेत.
किवळे येथे लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
आर्थिक फायद्यासाठी महिलेला आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या एका लॉजवर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई किवळे येथे केली.पोलिसांनी प्रेम विश्राम जैसवाल (५०, वेदांत पार्क, मुकाई चौक, किवळे, मूळ – ग्राम बढाईया, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. या प्रकरणी सुनील शिरसाट यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी पीडित महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता. पोलिसांनी कारवाई दरम्यान ८ हजार ५३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी याच पैशातून स्वतःची उपजीविका भागवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.
दारूचे बिल भरण्यास नकार दिल्याने कामगाराला मारहाण
दारूचे बिल भरण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका टोळक्याने बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करून जखमी केले. ही घटना थेरगाव येथे घडली.या प्रकरणी मारुती रामधन रुडे (५१, थेरगाव, मूळ – हारू, यवतमाळ) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दत्ता पाटेकर (२५) याला अटक केली असून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला दारूचे बिल भरण्यास सांगितले होते. फिर्यादीने नकार दिल्याने आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी दत्ता याने दारूची रिकामी बाटली फोडून फिर्यादीच्या पाठीवर आणि डाव्या हातावर मारली, ज्यामुळे ते जखमी झाले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
चाकण परिसरात १२ लाखांचा गांजा जप्त; तिघांना अटक
बेकायदेशीररीत्या गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई शिक्रापूर-चाकण हायवे रोड, मोहितेवाडी येथे करण्यात आली.या प्रकरणी पोलीस शिपाई निखिल वर्षे यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संदीप भगवान हांडे (२८, खराबवाडी, मूळ – छत्रपती संभाजीनगर), गणेश सुरेश तारू (३०, खराबवाडी, मूळ – आंबेगाव) आणि रिहान वसीम शेख (१९, खंडोबामाळ, चाकण) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून विक्रीसाठी २३ किलो ५३८ ग्रॅम वजनाचा गांजा बाळगला होता. जप्त केलेल्या गांजाची किंमत १२ लाख १० हजार ५०० रुपये आहे. पोलिसांनी गांजासह तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकण दक्षिण पोलीस तपास करत आहेत.
थेरगाव येथे ३.३० लाखांचा गांजा पकडला
स्मशानभूमी परिसरातील लाकूड वखारीजवळ गांजाची विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई थेरगाव येथे केली.पोलिसांनी अशोक संतोष आडवाणी (२८, थेरगाव) याला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बेकायदेशीररीत्या गांजाची विक्री करण्यासाठी तिथे थांबला होता. त्याच्या ताब्यातून ३ किलो ९१५ ग्रॅम वजनाचा गांजा, एक मोबाईल आणि मोपेड दुचाकी असा एकूण ३ लाख ३० हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
