पिंपरी : पिंपरीतील एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना वेटरच्या हातातील पाणी ताटात उडाल्याने झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना पिंपरी येथे घडली.या प्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र हॉटेलमध्ये जेवण करत असताना वेटर टिशू पेपर घेत होता, तेव्हा वेटरच्या हातातील पाणी फिर्यादीच्या ताटात पडले. यावरून फिर्यादीने त्यास टोकले असता त्याने दोघांना बोलावून घेतले. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. किचनमधील कांदा कापायचा स्टीलचा चाकू फिर्यादीच्या नाकावर मारून त्यांना जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

झाडे तोडण्यावरून वाद, दगडफेक आणि मारहाण

शेतातील झाडावर ट्रॅक्टर घातल्याच्या आणि झाडे तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून दोन व्यक्तींना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी शेलपिंपळगाव येथे घडली.

याप्रकरणी ४२ वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या घरामागे असलेल्या झाडावर ट्रॅक्टर घातला आणि झाडे तोडू लागले. फिर्यादीच्या चुलत भावाने त्यांना झाडे का तोडता असे विचारले असता, आरोपींनी त्यांना दगड, काठी आणि हाताने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या हाताचे बोट आणि त्यांच्या भावाच्या पायाचे बोट फॅक्चर झाले आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.

भरधाव मोटारीच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी; चालक फरार

रस्त्याने पायी जात असलेल्या एका ६१ वर्षीय वृद्ध महिलेला भरधाव मोटारीने पाठीमागून धडक दिली, ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना ११ डिसेंबर रात्री साई बाजार, दिघी येथील सार्वजनिक रोडवर घडली.

याबाबत जखमी झालेल्या महिलेच्या मुलाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटार चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई या या भाजीपाला आणण्यासाठी एकट्याच पायी जात होत्या. यावेळी आरोपीने आपली मोटार निष्काळजीपणे चालवून त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाच्या खुब्याला फॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. अपघात घडल्यानंतर चालक मदतीसाठी न थांबता तिथून पळून गेला. दिघी पोलीस तपास करत आहेत.

मिक्सर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या मिक्सर ट्रकने जोरात धडक दिली, ज्यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना देहू ते आळंदी रोडवरील रिव्हर चौकात घडली. या प्रकरणी एका महिलेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मिक्सर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती दुचाकीवरून चौकात सिग्नलला थांबले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या मिक्सर ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. या अपघातात फिर्यादीचे पती गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर चालक जखमींना दवाखान्यात नेण्याऐवजी गाडीसह तिथून पसार झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला थेरगाव परिसरात अटक

अवैध रित्या गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई मंगळवारी (२३ डिसेंबर) दुपारी थेरगाव येथे आली. या प्रकरणी पोलीस शिपाई कुणाल शिंदे यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी श्रीतेश उर्फ प्रेम सिद्राम कोळी (२५, रहाटणी) याला अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा थेरगाव परिसरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडून १३ हजार ४०० रुपये किमतीचा २६८ ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे. काळेवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

वाकडमध्ये गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई

झोपडपट्टी परिसरात बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (२४ डिसेंबर) दुपारी मातोबानगर झोपडपट्टी, वाकड येथे करण्यात आली.

याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई गोविंद डोके यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आरोपी आपल्या ताब्यात गांजा बाळगून त्याची विक्री करत असताना रंगेहात पकडली गेली. तिच्याकडून सहा हजार ८०० रुपये किमतीचा १३६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करत आहेत.

पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

बेकायदेशीरपणे गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (२४ डिसेंबर) रात्री बावधन येथील तलाठी ऑफिसजवळील मोकळ्या मैदानात करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई अरुण नरळे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार उर्फ चिक्या राजू जगताप (१९, विठ्ठलनगर, वारजे माळवाडी) आणि राम सुरेश वाघमारे (२३, वारजे माळवाडी, पुणे) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन मधील तलाठी ऑफिस जवळ मोकळ्या मैदानात दोघेजण पिस्तूल घेऊन आले असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून ओंकार आणि राम या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे प्रत्येकी एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक जिवंत राउंड असे एकूण दोन कट्टे आणि दोन राउंड मिळून आले आहेत. बावधन पोलीस तपास करत आहेत.