पिंपरी : नात्यातील मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने पत्नीवर दगडाने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सुदवडी मावळ येथे घडली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. याबाबत २२ वर्षीय पत्नीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचे त्याच्या नात्यातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला.

“तू इथून निघून जा, मला तुझ्यासोबत राहायचे नाही” असे म्हणत पतीने फिर्यादीला धमकावले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने “मी तुला आज जिवंत सोडणार नाही” असे म्हणत फिर्यादीला जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर बाजूला पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादीच्या डोक्यात आणि गालावर तीन ते चार वेळा जोराने मारून त्यांना गंभीर जखमी केले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

मोबाईल हॅक करून सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक

मोबाईलवर लिंक पाठवून फोन हॅक केला आणि क्रेडिट कार्डवरून सहा लाख ४१ हजार रुपये ट्रान्सफर केले. याप्रकरणी फसवणूक झालेल्या व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. फिर्यादीने त्यातील लिंकवर क्लिक करताच त्यांच्या फोनमध्ये एक ॲप्लिकेशन डाऊनलोड झाले, ज्याद्वारे आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलचा एक्सेस मिळवला. यानंतर आरोपीने फिर्यादीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून त्यांच्या संमतीशिवाय सहा लाख ४१ हजार रुपये स्वतःच्या खात्यावर वळवून आर्थिक फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ११ लाखांचा गंडा

जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला लावून तीन जणांची ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना एप्रिल २०२३ ते मार्च २०२६ दरम्यान नवी सांगवी येथे घडली.या प्रकरणात तरुणाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीसह दोघांना एका कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा १० ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादीने २.५० लाख, दुसऱ्याने पाच लाख आणि आणखी एकाने दोन लाख रुपये गुंतवले. आरोपीने एक वर्षानंतर मुद्दल परत करण्याचे लेखी करार करून देखील पैसे परत न देता एकूण ११ लाख रुपयांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

भोसरीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर दगडफेक आणि मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरून एका टोळक्याने तरुणाला आणि त्याच्या मित्रांना बेदम मारहाण करत दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी सद्गुरूनगर, भोसरी येथे घडली.याप्रकरणी सतीश अर्जुन पाटील (३४, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरज सुखदेव लष्करे, ऋषीकेश हरी लोहार, पार्थ वसंत खुने, सोहल जिलानी मुजावर आणि गोविंद लालु रूपवते या पाच आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र गप्पा मारत थांबले असताना आरोपींनी तिथे येऊन एका मित्रासोबत असलेल्या जुन्या भांडणाचे कारण काढले. आरोपींनी बेकायदेशीर गर्दी जमवून शिवीगाळ करत फिर्यादी व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारले. तसेच त्यांच्या दिशेने दगडफेक केली, ज्यामध्ये फिर्यादीच्या डोक्याला दगड लागून ते जखमी झाले. त्यांचा मित्र हॉटेलमध्ये जीव वाचवण्यासाठी पळाला असता आरोपींनी हॉटेलमधील खुर्च्या आणि पाण्याचे ग्लास फेकून मारून त्यालाही जखमी केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून व्यापाऱ्यास मारहाण

आमच्याविरुद्ध तक्रार का दिली, असा जाब विचारत तिघांनी मिळून एका व्यापाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शास्त्रीनगर, पिंपरी येथे घडली.याप्रकरणी राजबहादूर रामदास यादव (४५, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी स्वप्निल चंदनशिवे (२१, पिंपरी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या घरी जेवण करत असताना आरोपींनी त्यांच्या घराचा दरवाजा वाजवला. फिर्यादी बाहेर आले असता आरोपींनी त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्याचा राग धरून त्यांना शिवीगाळ केली. यावेळी एका आरोपीने हाताने मारहाण केली, तर इतर दोन आरोपींनी लोखंडी रॉडने फिर्यादीच्या कपाळावर आणि नाकावर मारून गंभीर जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका दुकानदारावर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई बुधवारी (४ मार्च भुजबळवस्ती, वाकड येथे करण्यात आली.अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल मितेश यादव यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रताप गेपरराम देवासी (३१, वाकड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने आरोग्यास घातक असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आहे. असे असतानाही आरोपीने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी श्री धनलक्ष्मी ट्रेडर्स दुकानात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला विक्रीसाठी ठेवला होता. पोलिसांनी धाड टाकून १४ हजार ८४२ रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.