पिंपरी : सोशल मिडीयातील इंस्टाग्रामवरील ‘रील्स’ पाहताना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर स्टॉक मार्केटमध्ये आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाची ३० लाख ७० हजार ६०६ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्‍यात आली. ही घटना ८ ते २८ जून २०२५ या कालावधीत सांगवीत घडली.

याबाबत एका पुरुष फिर्यादीने सोमवारी ( २३ फेब्रुवारी) सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ते २८ जून २०२५ या कालावधीत फिर्यादी हे इंस्टाग्रामवर रील्स पाहत असताना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी झाले. आरोपींनी त्यांना अॅप डाउनलोड करायला सांगितले. स्‍टॉक मार्केटमध्‍ये गुंतवणूक केल्यास आकर्षक नफा मिळेल, असे सांगून विविध खात्यांमध्ये ३० लाख ७० हजार ६०६ रुपये भरायला लावले. परतावा न देता गुंतवणूक केलेली रक्कम हडप केल्याचे समोर आले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

गॅसचे बील भरले नाही, एपीके फाइल आणि …

गॅसचे बील भरले नाही, असे सांगत एपीके फाइल पाठवून एका नागरिकच्‍या खात्‍यातील एक लाख १५ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना २ जानेवारी २०२६ रोजी आकुर्डीत घडली.

याबाबत एका पुरूषाने २३ फेब्रुवारी रोजी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बँक खातेधारकासह दोघांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी दुपारी सव्‍वाबारा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी हे कंपनीत काम करीत असताना त्‍यांना तुमचे गॅस बिल भरायचे राहून गेले आहे, असे सांगितले. बिल अपडेट एपीके फाइल पाठविली. फिर्यादी यांनी ती फाइल उघडली असता आरोपींनी त्‍यांच्‍या बँक खात्‍यातून एक लाख १५ हजार रुपयांची रोकड काढून घेत फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

म्हाळुंगेत ८८४ ग्रॅम गांजासह तरुण अटकेत

गांजा बाळगल्याप्रकरणी २२ वर्षीय तरुणास अटक करण्यात आली. त्‍याच्‍याकडून ८८४ ग्रॅम वजनाचा गांजा जप्‍त करण्‍यात आला. सोमवारी (२३ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास म्हाळुंगेत ही कारवाई करण्यात आली.

चंदन मंजित सिंह (२२, सध्या रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड, मूळ रा. डुमरी, जि. बलिया, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई महेश नामदेव गावकवाड यांनी सोमवारी (२३ फेब्रुवारी) दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे ४४ हजार ५०० रुपये किमतीचा ८८४ ग्रॅम गांजा आढळून आला. पंचासमक्ष जप्ती करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

कुरुळी येथे हातभट्टीचा साठा उद्ध्वस्त; एकावर गुन्‍हा

कुरुळी येथील ओढ्याच्या काठावरील झुडपांत हातभट्टी दारू तयार करण्यासाठी साठवलेले रसायन जप्त करण्यात आले. सोमवारी (२३ फेब्रुवारी) रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

पोलीस शिपाई राजेंद्र परमेश्वर खेडकर यांनी दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी टाकलेल्‍या छाप्यात ५ हजार ५०० लिटर कच्चे रसायन व १०५ लिटर तयार मद्य असा सुमारे २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी झाडाझुडपांच्या आडून पळून गेला. दक्षिण म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

पाणीपाळीच्या वादातून कुटुंबास मारहाण

शेतीच्या पाणीपाळीच्या वादातून महिलेसह तिच्या कुटुंबाला मारहाण करण्‍यात आली. ही घटना रविवारी (२२ फेब्रुवारी) रोजी खेड तालुक्‍यातील काळूस येथे घडली.

याबाबत एका महिलेने उत्‍तर चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाणी भरण्याच्या वादातून आरोपींनी फिर्यादीच्या पतीस काठीने मारहाण केली. फिर्यादी मध्ये पडल्यावर त्यांच्या मनगटावर दगड मारून जखमी केले, शिवीगाळ करून धमकी दिली. उत्तर चाकण पोलीस तपास करत आहेत.

सार्वजनिक ठिकाणी अनैतिक कृत्य; महिलेवर गुन्हा दाखल

सार्वजनिक ठिकाणी अनैतिक वर्तन केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी (२३ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी पुणे-मुंबई महामार्गावरील तळेगाव दाभाडे येथील सीआरपीएफच्‍या गेटसमोर ही कारवाई करण्‍यात आली.

याप्रकरणी एका महिलेवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस शिपाई उदयकुमार भोसले (३९) यांनी सोमवारी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून येणाऱ्या-जाणाऱ्यांना अडथळा निर्माण केला. अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.