पिंपरी : कंपनीच्या गोपनीय कराराचा भंग करून कंपनीची माहिती प्रतिस्पर्धी कंपनीला देऊन फसवणूक करण्यात आली. ही घटना चिंचवडी एमआयडीसी येथील एका कंपनीत १ मार्च ते ३१ मे २०२५ या कालावधीत घडली. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फसवणूक झालेल्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. आरोपीने कंपनीसोबत गोपनीयतेचा करार केला होता. तसेच कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर १२ महिन्यापर्यंत अन्य प्रतिस्पर्धी कंपनीत काम न करण्याची अट आरोपीने मान्य केली होती. असे असूनही आरोपीने कंपनीतून नोकरी सोडल्यानंतर कंपनीची संवेदनशील माहिती स्वतःच्या वैयक्तिक ई-मेलवर पाठवली. त्यानंतर प्रतिस्पर्धी कंपनीत नोकरी स्वीकारून व्यावसायिक फायदा मिळवण्यासाठी माहितीचा गैरवापर करून फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

विकलेल्या जागेचा पुन्हा व्यवहार

आधीच विक्री केलेल्या जमिनीची सात जणांनी मिळून पुन्हा विक्री करून शेतकऱ्याची १५ लाख ६५ हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना खेड तालुक्यातील रासे येथे घडली.याप्रकरणी दिगंबर चंद्रकांत लोणारी (४९, रा. भोसे, ता. खेड, जि. पुणे) यांनी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश एकनाथ शिंदे, देविदास एकनाथ शिंदे, सोमनाथ तुकाराम टोपे आणि विजय ज्ञानोबा शिंदे (सर्व रा. भोसे, ता. खेड) यांना अटक केली आहे. तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील रासे येथील एका जमिनीची आधीच विक्री झालेली असतानाही आरोपींनी ती माहिती लपवून पुन्हा व्यवहार केला. २०१६ मध्ये फिर्यादीकडून १६ लाख ६५ हजार रोख व धनादेशाद्वारे स्वीकारून फसवणूक केली. चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण दक्षिण पोलीस तपास करत आहेत.

गुटख्याची विक्री करणाऱ्याला अटक

कायद्याने बंदी असलेल्या गुटख्याची विक्री केल्याप्रकरणी एका दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी, संजय गांधीनगर येथे बुधवारी करण्यात आली.याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सायली शंकर टावरे (३३, अन्न सुरक्षा अधिकारी, पिंपरी-चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलेश रमेश गुप्ता (२५, रा. गांधीनगर काळेवाडी रोड, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश गुप्ता हा जनरल स्टोअर्स येथे बंदी असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळले. कारवाईदरम्यान सुमारे २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.