पिंपरी : देहूरोड परिसरातील एका ज्वेलर्स दुकानदाराने ग्राहकांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ही घटना १ जानेवारी २०२६ ते ३ फेब्रुवारी २०२६ दरम्यान देहूरोड येथे घडली. याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर साक्षीदारांकडून सोन्याचे दागिने दुरुस्तीसाठी तसेच नवीन दागिने घडवण्यासाठी ६५७ ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असे एकूण २६ लाख ६० हजार १५० रुपये स्वीकारले होते. मात्र, दागिने किंवा रक्कम परत न देता आरोपींनी दुकान बंद करून ४० हून अधिक लोकांची फसवणूक केली. त्यानंतर आरोपीत दुकान बंद करून पळून गेले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

गुंतवणुकीवर परताव्याचे आमिष दाखवून १३ लाखांचा गंडा

जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १३ लाखांची फसवणूक केली. ही घटना १६ जुलै २०२५ ते ३ मार्च २०२६ दरम्यान किवळे येथे घडली. या प्रकरणात ३८ वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या एका मित्राला गुंतवणुकीवर ५ ते ७ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी क्रेडिट कार्डद्वारे १५ लाख २५ हजार रुपयांची गुंतवणूक केली. आरोपीने सुरुवातीला २ लाख ५ हजार रुपये परतावा म्हणून दिले, मात्र उर्वरित रक्कम परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

भागीदारी व्यवसायात ३६ लाखांचा अपहार; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

बांधकाम व्यवसायात भागीदारी करून गुंतवणूकदाराच्या पैशांचा वैयक्तिक कामासाठी वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. ही घटना १२ फेब्रुवारी २०२४ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली. याप्रकरणी ३३ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला भागीदारीत बांधकाम व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. फिर्यादीने संस्थेमध्ये एकूण ८० लाख ४७ हजार ३४९ रुपयांची गुंतवणूक केली होती. आरोपीने त्यापैकी ३६ लाख ९५ हजार ८८० रुपये व्यवसायासाठी न वापरता स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी खर्च केले. फसवणूक लपवण्यासाठी आरोपीने बनावट हिशोब तयार करून फिर्यादीला ईमेलवर पाठवला होता. आरोपीने स्वतःची सॅलरी व कमिशन दाखविले. तसेच स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी पैसे खर्च करून फिर्यादी यांच्या पैशांचा अपहार करत त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

आईकडे पाहिल्याच्या कारणावरून भंगार विक्रेत्याला लोखंडी रॉडने मारहाण

आईकडे का पाहतोस असे विचारून एका तरुणाने भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बिजलीनगर, चिंचवड येथे घडली. याबाबत ४० वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भरत किशोर दोलारामन (बिजलीनगर, चिंचवड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरासमोरून भंगारच्या बाटल्या गोळा करत जात असताना आरोपीच्या आईने त्यांना “माझ्याकडे काय पाहतो” असे विचारले. फिर्यादीने मी पाहत नाही असे उत्तर दिले असता आरोपीने रागाच्या भरात येऊन शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या पायावर, हातावर आणि डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

डिलिव्हरी बॉयचे काम मागितल्याच्या वादातून तरुणाला मारहाण

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करण्यावरून झालेल्या वादातून दोन तरुणांनी एका डिलिव्हरी पार्टनरला मारहाण करून त्याचे नाक फॅक्चर केले आणि दात पाडले. ही घटना शनिवारी (४ एप्रिल) पिंपरीत घडली. या प्रकरणात १९ वर्षीय तरुणाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र चहा पिण्यासाठी गेले असताना आरोपीने डिलिव्हरी बॉयचे काम मागितले. फिर्यादीच्या मित्राने त्याला काम करू नकोस असे म्हटल्याचा राग मनात धरून आरोपींनी वाद सुरू केला. आरोपीने फिर्यादीच्या नाकावर जोरात ठोसा मारून नाक फॅक्चर केले, तर दुसऱ्या आरोपीने डोळ्यावर आणि ओठावर मारून फिर्यादीचे दात पाडले. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.