पिंपरी : जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही घटना शनिवारी (२३ मे) रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास काळेवाडी येथील एम. एम. चौकात घनकचरा स्थलांतर केंद्रासमोर घडली.
अजित राजू चौगुले (२५, काकडे पार्क, चिंचवड), अनिकेत राजेंद्र तुपे (१९), सचिन बाबासाहेब चौधरी (२६) आणि वसिम बाबर खान (वय २८, तिघे रा. थेरगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सचिन संपत शिंदे (२५, आनंदनगर, चिंचवड) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मेव्हण्याबरोबर आरोपींचा किरकोळ वाद झाला होता. त्याच रागातून आरोपींनी त्याला गाठून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर धारदार हत्याराने त्याच्या पाठीवर वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न कला. यात तो गंभीर जखमी झाला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
गहुंजेतील उच्चभ्रू सोसायटीत घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण
गहुंजे येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेमध्ये घुसून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत धमकी दिली. आरोपी फिर्यादी महिलेला शोधण्यासाठी आले होते. मात्र ती न मिळाल्याने तिच्या वडिलांना मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (२४ मे) रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास घडली.
एका महिला फिर्यादीने शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मध्यरात्री सोसायटीतील एका सदनिकेमध्ये जबरदस्तीने घुसले. फिर्यादी महिला घरी नसल्याचे लक्षात येताच आरोपी संतापले. आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना बुक्के मारले. तसेच अन्य आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार करण्यात आलेला अट्टल गुन्हेगार धारदार कोयत्यासह फिरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही कारवाई रविरी (२४ मे) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास निगडीतील संग्रामनगर झोपडपट्टी परिसरात करण्यात आली.
आयुब चमन खान (२८, ओटास्किम, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक मधील पोलीस हवालदार जयवंत राऊत यांनी रविवारी (२४ मे) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयुब खान याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तसेच शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही तो बेकायदेशीररीत्या शहरात फिरत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. झडतीदरम्यान त्याच्याकडून धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला
पिंपरीतील गांधीनगर परिसरात पायी कामावर जाणाऱ्या तरुणाला अडवून डोक्यात धारदार वस्तूने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी (२२ मे) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला.
याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पायी कामावर जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. “तू इथल्या पोरांसोबत का राहतोस?” अशी विचारणा करत आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना ढकलून दुचाकीवर पाडले. यातील एका आरोपीने धारदार वस्तूने त्यांच्या डोक्यात वार केला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
