पिंपरी : मोशी येथील एका बांधकाम प्रकल्पावर जेवण बनविण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराचा गॅस सिलेंडरच्या टाकीने ठेचून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (९ मार्च) कुदळे वस्ती येथील लेबर कॅम्पमध्ये घडली.
बालाजी मारोती रेड्डी खंदाडे (२९, हंगरगा, मुखेड, नांदेड) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणात अनिकेत विनायक भुरे (२१, भालचंद्र उपवन सोसायटी, पुनावळे, पुणे; मूळ पत्ता: समुद्राळ, उमरगा, धाराशिव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रदीप विठ्ठल गुंडरे (३१, दक्षिण लक्ष्मीनगर, मोशी, पुणे; मूळ पत्ता: आंदोरी, अहमदपूर, लातूर) या आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत युवक आणि आरोपी हे नातेवाईक असून दोघेही हवालदार वस्ती येथील एका बांधकाम प्रकल्पावर मजूर म्हणून काम करत होते. त्याच ठिकाणी ते राहत होते. सोमवारी रात्री मद्यपान केल्यानंतर जेवण बनविण्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यात आरोपी प्रदीप याने बालाजी याच्या डोक्यात सिलेंडरची टाकी घातली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी तपास करत आहेत.
अपघात झाल्यानंतर तरुणाला बेदम मारहाण करत खुनाचा प्रयत्न
रहाटणी येथील बीआरटी रोडवर दुचाकीचा अपघात झाल्यानंतर झालेल्या वादातून एका तरुणाचा गळा दाबून आणि बेल्टने मारहाण करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सोमवारीघडली.
याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांचा अपघात झाला. यावेळी तिथे कारमधून आलेल्या आरोपींनी “तुझीच चूक आहे” असे म्हणत वाद घातला. एकाने फिर्यादीचा गळा दाबला, तर त्याच्या साथीदाराने कमरेच्या बेल्टने फिर्यादीच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर प्रहार केले. आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
मुंबई-बेंगळुरू हायवेवर एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (९ मार्च) सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास म्हाळुंगे येथील मुळा नदी पुलावर घडली.
अभिजीत घाडगे असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. याबाबत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मित्र अभिजीत घाडगे हा आपल्या दुचाकीवरून हिंजवडीकडून चांदणी चौकाच्या दिशेने जात होता. म्हाळुंगे येथील मुळा नदी पुलावर आला असता, पाठीमागून येणाऱ्या ट्रक चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आणि बेदरकारपणे वाहन चालवून अभिजीतच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे अभिजीतचा मृत्यू झाला. बावधन पोलीस तपास करत आहेत.
रस्ता ओलांडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीची धडक; चालक फरार
निगडी येथील जुना पुणे-मुंबई रोडवर रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीस्वाराने जोरात धडक देऊन गंभीर जखमी केले. ही घटना १ मार्च रोजी घडली.
या प्रकरणात ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील हे निगडी एसटी बस स्थानकासमोरून रस्ता ओलांडत होते. यावेळी एका अज्ञात दुचाकीस्वाराने वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून, अपघात घडल्यानंतर चालक मदतीसाठी न थांबता तिथून पळून गेला. निगडी पोलीस या फरार चालकाचा शोध घेत आहेत.
तळेगाव दाभाडे येथे तीन गावठी पिस्तूलसह तिघांना अटक
तळेगाव दाभाडे परिसरात बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगणाऱ्या तीन तरुणांना गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई मंगळवारी (१० मार्च) रात्री ९:२५ वाजेच्या सुमारास सोमाटणे फाटा येथे करण्यात आली.
सरदार अकबर सय्यद (२७, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे), विशाल नाना कुडेकर (३५, अनावळे, खेड, पुणे) आणि प्रशांत बबुशा सोनवणे (२८, अनावळे, खेड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई हर्षद कदम यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात शस्त्र वापरण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपींनी त्याचे उल्लंघन केले. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना १ लाख ५० हजार रुपये किमतीची ३ लोखंडी देशी बनावटीची पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केले असून तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करत आहेत.
