पिंपरी : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने प्रियकराच्या साथीने आईने सहा वर्षाच्या मुलाचा पाण्यातील बादलीमध्ये डोके बुडवून आणि भितींवर, जमिनीवर डोके आपटून खून केला. मुलाचा खून केल्यानंतर मृतदेह गावी घेऊन जात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे महिलेने नातेवाईकांना भासवण्याचा प्रयत्न केला. ही घटना चार एप्रिल रोजी खेडच्या कुरुळी घडली.
खून झालेल्या सहा वर्षीय मुलाच्या आजोबाने याप्रकरणी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आईला अटक केली असून तिचा प्रियकर पसार झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी महिला आणि तिचा प्रियकर बीड जिल्ह्यातील असून एकाच गावातील आहेत. तिथे दोघांचे प्रेमसंबंध जुळाले. याची महिलेच्या नवऱ्याला माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे महिला पुण्यात प्रियकराबरोबर राहण्यास आली.
महिलेला तीन मुले असून प्रियकराचे लग्न झाले नाही. सहा वर्षाच्या मुलाला घेऊन महिला पुण्यात प्रियकराबरोबर वास्तव्य करित आहे. त्यांच्या प्रेमसंबंधात सहा वर्षीय मुलगा अडथळा ठरत होता. त्यातून त्यांच्यात वाद होऊ लागले. त्यामुळे दोघांनी चार एप्रिल रोजी रात्री मुलाला स्वच्छतागृहात नेले. त्याचे डोके बादलीतील पाण्यात बुडवून दाबून धरुन ठेवले.
भिंतीवर, जमिनीवर डोके आपटले. त्यात मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघेही मृतदेह घेऊन गावी गेले. महिला मृतदेह घेऊन घरात गेल्यानंतर प्रियकर तेथून पसार झाला. हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा बनाव महिलेने केला.
मात्र, नातेवाईकांना संशय आला. नातेवाईकांनी बीड जिल्ह्यातील परळी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. शवविच्छेदन अहवालात मुलाचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला नसून पाण्यात बुडाल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी आईला ताब्यात घेत तिच्याकडे विचारपूस केली असता तिने प्रियकराबरोबर मिळून मुलाचा खून केल्याची कबुली दिली. परळी पोलिसांनी हा गुन्हा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
थेरगाव येथे अमली पदार्थासह तरुणाला अटक
विक्रीसाठी अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला काळेवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (८ एप्रिल) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास थेरगाव येथे करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल विजय मोरे यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक चंद्रकांत सोनकांबळे (२३, थेरगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे ५९ हजार ९०० रुपये किमतीची ३.४९ ग्रॅम पांढऱ्या रंगाची पावडर (एमडी सदृश्य) आणि एक मोबाईल मिळून आला आहे. हा अमली पदार्थ तो बेकायदेशीरपणे विक्रीसाठी घेऊन आला होता. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.
