पिंपरी : पिंपरीतील साई चौक परिसरात असलेल्या एका हॉटेलमधील वेटरने जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून एका ग्राहकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (४ मे) रात्री २ वाजताच्या सुमारास घडली. तर, आयटी पार्क हिंजवडीत दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पिंपरीतील घटनेप्रकरणी अशिष जगन्नाथ वाळुंज (३०, नेहरुनगर पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्बास असादुन शेख (३०, पिंपरी), मोहंमद अजिज आशान शेख (२१, पिंपरी) आणि पंकज ऊर्फ बंटी शंकर भुमकर (३०, बौध्दनगर, पिंपरी) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. हॉटेल बंद झाल्याचे वेटरने जोरात सांगितल्याने फिर्यादीने त्याला नीट बोलण्यास सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी स्वयंपाक करण्याच्या झाऱ्याने आणि इतर वस्तूंनी फिर्यादीला मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच आरोपीने हातातील झारा हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
हिंजवडीत दीड किलो गांजासह एकाला अटक
माण-बोडकेवाडी परिसरात विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एकाला हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (४ मे) दुपारी ३:१० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी संजय विश्वनाथ राय (५७, बोडकेवाडी, माण, मूळ रा. पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय हा बोडकेवाडीतील एका पत्रा शेडजवळ अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या ताब्यातून ७८,५०० रुपये किमतीचा १५७१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कारचा भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, पाच जण जखमी
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भरधाव कारने ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघात एका महिलेचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (४ मे) पहाटे ४ वाजेच्या सुमारास ओझर्डे गावच्या हद्दीत घडली.
सुनीता नारायण भट (५५, विले पार्ले, मुंबई) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. चार जण जखमी झाले आहेत. याबाबत ट्रेलर चालकाने शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा ट्रेलर मुंबई येथून पुण्याच्या दिशेने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने जात होते. ओझर्डे गावच्या हद्दीत आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कारने ट्रेलरला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात सुनिता भट यांचा मृत्यू झाला, तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत. गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
जमिनीच्या वादातून भावाला मारहाण
खेड तालुक्यात जमिनीच्या लेव्हलिंगचे काम थांबवण्यास सांगितल्याने एका वृद्ध शेतकऱ्याला त्याच्याच भावाने आणि पुतण्यांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (३ मे) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत ६५ वर्षीय व्यक्तीने उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या जागेत आरोपी जेसीबीने जमीन लेव्हल करत असल्याचे पाहून फिर्यादीने त्यांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारले. तसेच दगड, काठीने पाठीवर मारून जखमी केले. फिर्यादी तक्रार देण्यासाठी जात असताना जेसीबी चालकाने त्यांना धमकी देत कानशिलात लगावली. उत्तर महाळुंगे पोलीस तपास करत आहेत.
जुन्या भांडणातून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला
मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळ येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकरी कुटुंबाला काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (४ मे) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
या प्रकरणी ५७ वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी जुन्या वादातून फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपीने काठीने कपाळावर, दगडाने डोळ्याच्या बाजूला मारून फिर्यादीला जखमी केले. फिर्यादीची पत्नी आणि मुलगा वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही जमिनीवर पाडून काठीने व हाताने मारहाण करण्यात आली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
त्रिवेणी नगरमध्ये ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
निगडी परिसरातील त्रिवेणी नगर चौकात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (४ मे) पहाटे २:१० वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोपेडवरून घरी जात असताना त्रिवेणी नगर चौकातील हनुमान मंदिराजवळ मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या उजव्या पायाचा पंजा आणि टाचेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात झाल्यानंतर चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पळून गेला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
देहुरोड येथे गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई
देहुरोड परिसरात अवैध गांजा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (४ मे) दुपारी २:३५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई रणधिर माने यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल जगन्नाथ बोरसे (४२, आंबेडकर नगर रोड, देहुरोड) याला अटक करण्यात आली असून, त्याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर नगर देहूरोड येथे आरोपी अनिल हा गांजा विक्रीसाठी जवळ बाळगून असताना मिळून आला. त्याच्याकडून १२,१०० रुपये किमतीचा २४२ ग्रॅम गांजा, मोबाईल आणि वजनकाटा असा एकूण २२,३५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. हा माल त्याने एका महिलेकडून आणल्याचे चौकशीत समोर आले आहे. देहुरोड पोलीस तपास करत आहेत.
चाकणमध्ये पिस्टल आणि जिवंत काडतुसासह तरुण अटकेत
चाकण परिसरात विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई सोमवारी (४ मे) सायंकाळी ७:२० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
प्रविण अशोक प्रधान (२२, बीडवस्ती, चाकण, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई महेश कोळी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी चाकण-पठारवाडी रोडवरील मोकळ्या जागेत ही कारवाई केली. आरोपीच्या ताब्यातून ५०,००० रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि १,००० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ५१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.
एमआयडीसी भोसरीत पिस्टल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
भोसरी एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या मैदानात गावठी बनावटीचे पिस्टल घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सोमवार (४ मे) सायंकाळी ६:३५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सचिन अरुण गायकवाड (३५, बालाजीनगर झोपडपट्टी, एम.आय.डी.सी भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार स्वप्नील शेलार यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
इंद्रायणी नगरकडे जाणाऱ्या रोडवरील माने इंजिनिअरिंग कंपनी शेजारील मैदानावर आरोपी संशयास्पदरीत्या थांबला होता. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४०,००० रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि ५०० रुपये किमतीचा एक जिवंत राऊंड मिळून आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.
काळेवाडीत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
काळेवाडी परिसरातील ब्रिजजवळ सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई सोमवारी (४ मे) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
२३ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई शैलेश संजय सरकाळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
काळेवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करत असताना एम्पेयर इस्टेट ब्रिजजवळील फुटपाथवर आरोपी हा अमली पदार्थांचे सेवन करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असून काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
–
