पिंपरी : रेसचा बैल पळवल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे कारण मनात धरून एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना सुसगाव येथे घडली. याप्रकरणी सिद्धांत कैलास मानमोडे (२०, सुसगाव, मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रणव काशीनाथ वाघमारे ऊर्फ चिव्हया (१९, सुतारवाडी, पाषाण) याला अटक केली आहे. दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिनाभरापूर्वी रेसचा बैल पळवण्याच्या कारणावरून आरोपी आणि फिर्यादी यांच्यात शिवीगाळ झाली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घटनास्थळी फिर्यादीला गाठून आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. बावधन पोलीस तपास करत आहेत.
टेलिग्राम टास्कच्या बहाण्याने तरुणाची १३ लाखांची फसवणूक
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीवर ३०० टक्के परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला १३ लाख ४१ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ही घटना ऑनलाइन पद्धतीने घडली. याबाबत ३६ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला टेलिग्रामवरील एका ग्रुपमध्ये सामील करून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून विविध बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने एकूण १३ लाख ४१ हजार रुपये गुंतवले, मात्र जेव्हा त्यांनी पैसे परत मागितले, तेव्हा ‘तुमचे पैसे ट्रेडिंग ॲपमध्ये अडकले आहेत’ असे सांगून आरोपीने आणखी सात लाख रुपयांची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
मद्यधुंद मोटार चालकाने ‘डिलिव्हरी बॉय’ला चिरडले
मद्याच्या नशेत भरधाव मोटार चालवून एका दुचाकीस्वाराला धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना बावधन परिसरात घडली आहे. ही घटना मंगळवारी (१६ डिसेंबर) पहाटे बावधन येथील चांदणी चौकात घडली. या प्रकरणी २४ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोटार चालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा चुलत भाऊ हा खाद्यपदार्थची ऑर्डर आल्यामुळे दुचाकीसह थांबला होता. आरोपीने मद्याच्या नशेत मोटार चालवून दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीचा भाऊ जखमी झाला आहे. बावधन पोलीस तपास करत आहेत.
भाड्याने घेतलेली मोटार गहाण ठेवून मालकाकडेच मागितली खंडणी
भाड्याने घेतलेली मोटार परत न करता ती दुसऱ्याकडे गहाण ठेवून मूळ मालकाकडेच एक लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार चिखलीत समोर आला आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची मोटार भाड्याने नेली. ती परत केली नाही. फिर्यादीने जीपीएसद्वारे मोटारीचा शोध घेतला असता ती एकाकडे असल्याचे समजले. फिर्यादीने मोटार परत मागितली असता, ही मोटार माझ्याकडे गहाण ठेवली आहे, जर मोटार हवी असेल तर एक लाख रुपये द्या” अशी धमकी देऊन खंडणी मागितली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकास अटक
चऱ्होली बुद्रुक परिसरात अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी मोटारीत रंगेहाथ पकडले आहे. पोलीस शिपाई सोमनाथ खळसोडे यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परशुराम जगन्नाथ मदने (४०, लोहगाव, पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परशुराम हा मोटारीत बेकायदेशीररीत्या मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ बाळगून विक्रीसाठी आला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४७ हजार ३०० रुपये किमतीचे ५.४३ ग्रॅम एमडी, दोन मोबाईल, एक मोटार आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख ६८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
तळेगाव एमआयडीसी परिसरात चार हजार लिटर रसायन जप्त
हातभट्टीची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई आंबी गावच्या हद्दीतील ओढ्याकाठी करण्यात आली. पोलीस शिपाई रमेश घुले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. एका महिला आरोपीच्या विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने ओढ्याच्या कडेला गावठी हातभट्टीची दारू गाळण्यासाठी पाच हजार लिटर क्षमतेच्या लोखंडी टाकीत गुळमिश्रित कच्चे रसायन साठवून ठेवले होते. पोलिसांनी धाड टाकली असता तिथे अंदाजे चार हजार लिटर रसायन मिळून आले, ज्याची किंमत दोन लाख चार हजार रुपये आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार बेकायदेशीररीत्या शहरात वावरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर करण्यात आली. केतन प्रकाश शिंदे (२२, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई सचिन सातपुते यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केतन शिंदे याला पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार २८ नोव्हेंबर २०२५ पासून दोन वर्षांसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. असे असतानाही तो कोणतीही परवानगी न घेता आळंदी परिसरात फिरताना आढळला. झडती घेतली असता त्याच्याकडे ३०० रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता मिळून आला. हद्दपारीच्या आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आळंदी पोलीस तपास करत आहेत.
पिंपरीत प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरचा मोठा साठा जप्त
शासनाने बंदी घातलेल्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दुकानावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. ही कारवाई संत तुकारामनगर येथे करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई मितेश यादव यांनी या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांच्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेट, सिगारेट आणि हुक्का फ्लेवरचा साठा विक्रीसाठी ठेवला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ८५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
