पिंपरी : बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून रकमा स्वीकारून त्या खात्यात जमा न करता स्वतःसाठी वापरून अपहार केल्याचा प्रकार चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. ही घटना २०२० ते १३ जुलै २०२३ या कालावधीत चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी बँकेच्या वसुली अधिकाऱ्याने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बँकेत दैनंदिन ठेव जमा करण्याचे काम करत होता. त्याने बँकेच्या १२ किंवा त्यापेक्षा जास्त खातेदारांकडून ३० लाख ९१ हजार २५० रुपये स्वीकारले, मात्र ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून बँकेची आणि ग्राहकांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
चोरीच्या वाहनांचे सुटे पार्ट करून विकणाऱ्या चोराला अटक; स्क्रॅप सेंटरमधून गाड्यांचे पार्ट जप्त
चारचाकी वाहने चोरी करून ती स्क्रॅपमध्ये तोडून त्यांचे सुटे भाग विक्री करणाऱ्या वाहनचोराला काळेवाडी पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून तीन लाख ३० हजार रुपयांच्या किमतीची चारचाकी वाहने व त्यांचे पार्ट हस्तगत केले आहेत.
शिवा मिड्डुलाल यादव (२०, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना संशयित आरोपी पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार द्रुतगती मार्गावर पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने २९ जानेवारी रोजी मोटार साथीदारासह चोरी करून मोई येथील स्क्रॅप सेंटरमध्ये तोडून तिचे पार्ट वेगळे केल्याची कबुली दिली. शिवा यादव याच्याकडून तीन चारचाकी वाहनांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे काळेवाडी, भोसरी व भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एकूण तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
भांडण झाल्याचे इतरांना सांगितल्याच्या संशयावरून एकास मारहाण
दोघांमध्ये झालेले भांडण दुसऱ्याला सांगितल्याचा संशय घेऊन भांडण झालेल्या दोघांनी मिळून व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना ३१ जानेवारी रोजी रात्री १० वाजता निगडी येथील अंकुश चौकात घडली. या प्रकरणी ३३ वर्षीय तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींमध्ये भांडण झाले होते. हे भांडण फिर्यादीच्या समोर झाले. फिर्यादीने या भांडणाबाबत एकाला सांगितले असल्याचा आरोपींना संशय होता. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बांबूने आणि लोखंडी वस्तूने मारून त्यांना जखमी केले. निगडी पोलीस तपास करत आहेत.

