पिंपरी : बँकेचा टोल फ्री नंबर शोधताना चुकीच्या नंबरवर संपर्क झाल्याने एका व्यक्तीची १८ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार सांगवीत घडला आहे. ही घटना जानेवारी २०२५ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घडली.

याबाबत एका व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी मोबाईल क्रमांक धारक आणि बँक खाते धारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे एटीएम कार्ड चालत नसल्याने त्यांनी बँकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून बँकेच्या क्रमांकाशी साधर्म्य असलेल्या आरोपींच्या नंबरवर संपर्क झाला. आरोपीने फिर्यादीला विश्वासात घेऊन व्हॉट्सॲपवरून ओटीपी मागवून घेतला. तुमचे एटीएम कार्ड घरी येईल असे सांगून आरोपीने फिर्यादीच्या खात्यातून १८ लाख ४५ हजार रुपये काढून घेतले. बरेच दिवस झाले तरी त्यांचे एटीएम कार्ड घरी आले नाही. त्याबाबत त्यांनी बँकेकडे पाठपुरावा केला असता अशा प्रकारे त्यांचा बँकेशी कोणताही संपर्क झाला नसल्याचे निष्पन्न झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर दगडाने हल्ला

चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीवर दगडाने जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना निगडीत घडली. या प्रकरणी पत्नीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी हे पती-पत्नी आहेत. फिर्यादी महिला काम संपवून निगडी येथील कंपनीच्या बाहेर पडल्या असताना आरोपी तिथे आला. “तू मला सोडून दुसऱ्यासोबत राहतेस, आज तुला जिवंत सोडणार नाही,” असे म्हणत त्याने रस्त्याशेजारी पडलेला दगड उचलला. त्याने फिर्यादीला खाली पाडून त्यांच्या डोक्यात दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाल्या असून निगडी पोलीस तपास करत आहेत.

जादा भाड्यासाठी रिक्षा चालकाची प्रवाशाला मारहाण

ओला ॲपद्वारे बुक केलेल्या रिक्षाचे जादा भाडे मागितल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने प्रवाशाला आणि त्यांच्या कुटुंबाला लाकडी फळीने मारहाण केली. तसेच सुनेला ढकलून देत तेथून पलायन केले. ही घटना १५ मार्च रोजी सकाळी पावणे बारा वाजताच्‍या सुमारास वल्‍लभनगर येथे घडली.

याप्रकरणी ६९ वर्षीय व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मार्च रोजी दुपारी पावणे बारा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि सून रिक्षाने आपल्या घरी पोहोचले. तिथे रिक्षाचालकाने ॲपवरील भाड्यापेक्षा जादा पैसे मागितले. फिर्यादीच्या मुलाने जाब विचारला असता, चालकाने रिक्षातील लाकडी फळी काढून मुलाच्या डोक्यात आणि फिर्यादीच्या छातीवर मारली. तसेच फिर्यादीच्या नाकावर बुक्की मारून त्यांना जखमी केले. पती आणि सासरे यांना वाचविण्‍यासाठी आलेल्‍या त्यांच्या सुनेला ढकलून देऊन आरोपी पसार झाला. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

भाड्याने नेलेली मोटार लंपास

भाड्याने घेऊन जाण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीने मालकाचा विश्वास संपादन करून तीन लाख रुपये किमतीची मोटार चोरून नेली. ही घटना टॉवर लाइन चौक, तळवडे रोड चिखली येथे घडली.

याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी हा फिर्यादीच्या दुकानाजवळ आला. त्याने फिर्यादीची पांढऱ्या रंगाची तीन लाख रुपये किंमतीची मोटार भाड्याने घेऊन जाण्याच्या बहाण्याने नेली. मात्र, त्यानंतर ती मोटार परत न आणता तिचा अपहार केला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

जुन्या वादातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला

ईदनिमित्त लावलेले स्पीकर पाहण्यासाठी गेलेल्‍या एका १५ वर्षीय मुलाला जुन्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी कडे आणि कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (२१ मार्च) रात्री सव्‍वानऊ वाजताच्‍या सुमारास पवार वस्‍ती, दापोडी येथे घडली.

याप्रकरणी जखमी १५ वर्षीय मुलाने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मार्च रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास एका आरोपीने बोलावल्यामुळे फिर्यादी आपल्‍या काकाचा मुलगा, आत्‍याचा मुलगा यांच्‍याबरोबर पवार वस्ती येथे स्पीकर पाहण्यासाठी गेला होता. तिथे आरोपींनी जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादीच्या कपाळावर लोखंडी कड्याने आणि डोक्याच्या मागे कोयत्याने वार केले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावर टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वेगातील टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्‍वाराचा मृत्यू झाला. त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना रविवारी (२२ मार्च) रोजी रात्री साडेआठ वाजताच्‍या सुमारास खेड तालुक्यातील वाकी भाम या गावाच्‍या हद्‌दीत घडली.

हेमंत साबळे असे अपघातात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या दुचाकीस्‍वाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत दुचाकीस्‍वाराच्‍या पत्‍नीने सोमवारी उत्‍तर चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे पती हेमंत साबळे आणि ६ वर्षांचा मुलगा हे दुचाकीवरून खेड येथून चाकणकडे येत होते. यावेळी वाकी भाम गावात पुणे बाजूकडून येणाऱ्या टेम्पो चालकाने हयगयीने गाडी चालवून साबळे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात हेमंत साबळे यांचा मृत्यू झाला असून फिर्यादी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. उत्‍तर चाकण पोलीस तपास करत आहेत.