पिंपरी : नव्याने उभारण्यात येत असलेल्या बीअर उत्पादन कंपनीतील तब्बल ३६ लाख रुपये किमतीच्या स्टील स्टोअरेज टाक्या चोरीला गेल्या. याप्रकरणचा उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. कंपनीतील माजी कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक करण्यात आली असून चोरीला गेलेल्या सर्व दहा टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
खेड तालुक्यातील सावरदरी येथील एका बीअर उत्पादन कंपनीतून २० फेब्रुवारी ते ३० मार्च २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दहा स्टील टाक्या लंपास केल्या होत्या. याबाबत विवेक मारुती खैरे यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घटनेनंतर अनेक दिवस उलटल्यानंतर गुन्हा उघडकीस आल्याने तपासाचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते. पोलिसांनी परिसरातील ३० ते ३५ कंपन्यांचे तब्बल ६०० जीबीहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान एक संशयास्पद क्रेन आणि ट्रक आढळून आला. तांत्रिक तपासातून कंपनीचा माजी कर्मचारी प्रसाद विनोद राजळे (वय २९, रा. पिरंगुट) याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चोरीचा कट उघड झाला.
या प्रकरणात चंदन अर्जुन सिंग, अली अहमद चौधरी, फिरोज असगर अली खान, किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता आणि नियाज मोहम्मद इसराईल यांनाही अटक करण्यात आली. पोलिसांनी कुदळवाडी आणि मुंब्रा येथून चोरीला गेलेल्या सर्व टाक्या हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
निगडीतील लाॅजमध्ये तरुणाची आत्महत्या
एका तरुणाने लाॅजवर गळफास घेऊन आत्महत्या केली. निगडी येथे सोमवारी (१ जून) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यश कदम (२६, ओटास्किम, निगडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. निगडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यश कदम हा निगडी येथील एका लाॅजवर गेला होता. तेथे त्याने गळफास घेतला. याबाबत माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डाॅक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
वाहन विक्री कराराचे उल्लंघन करून मालकाची आर्थिक फसवणूक
वाहन विक्री करारातील अटींचे उल्लंघन करून एका फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते न भरता एकाने वाहनाचा परस्पर गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ नोव्हेंबर २०२४ रोजी भोसरी येथे घडली. याप्रकरणी ३५ वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीचे वाहन आरोपीला करारनामा करून विकले होते. या वाहनावरील फायनान्स कंपनीचे कर्जाचे हप्ते भरण्याची जबाबदारी आरोपीने स्वीकारली होती. मात्र, काही हप्ते भरल्यानंतर उसने पुढील हप्ते भरणे बंद केले आणि हे वाहन परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात दिले. वारंवार सांगूनही आरोपीने वाहन नावावर हस्तांतरित करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, या वाहनावर नाशिक वन विभागाकडून अवैध वाहतूक प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. करार पाळण्याऐवजी आरोपीने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक दशवंत करीत आहेत.
कार आडवी लावून बांधकाम व्यावसायिकाला मारहाण
पुणे ते रावेत असा प्रवास करणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या कारला ओव्हरटेक करून गाडी आडवी लावत मारहाण केली. ही घटना शनिवारी ( ३० मे) रोजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील मोरवाडी ब्रिजखाली घडली आहे.
याप्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे नातेवाईक कारने जात असताना, मोरवाडी ब्रिजखाली ग्रेड सेपरेटर रोडवर आरोपींनी त्यांच्या वाहनाने फिर्यादीच्या कारला ओव्हरटेक केले. यादरम्यान रस्त्यावर साचलेले पाणी फिर्यादी व त्यांच्या गाडीतील नातेवाइकांच्या अंगावर उडाले. आरोपींनी फिर्यादीच्या कारसमोर स्वतःची कार आडवी लावून रस्ता अडवला. त्यानंतर कारमधून उतरून फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने जबर मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.
