पिंपरी : वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांना औषधे व इंजेक्शन्स देऊन बेकायदेशीरपणे उपचार करित रुग्णांची फसवणूक करणाऱ्या एका बोगस डॉक्टराला रावेत पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (१६ ऑगस्ट) मध्यरात्री बाराच्या सुमारास पांढरे वस्ती, पुनावळे येथे करण्यात आली.

भागवत टेटकुराम निषाद (वय ३९, रा. रावेत) असे अटक केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. प्रकरणी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मोरे (४७, चिंचवड, पुणे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे यांनी याबाबत माहिती दिली. निषाद हा पांढरे वस्ती, पुनावळे येथे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना नागरिकांना औषधे देत असून त्यांच्यावर उपचार करत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला मिळाली. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार मोरे यांच्या पथकाने पाहणी केली. तिथे आरोपी भागवत निषाद हा औषध व इंजेक्शन्सची विक्री करून रुग्णांची तपासणी करत असल्याचे आढळले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आरोपीकडे वैद्यकीय अर्हता नसतानाही तो बेकायदेशीररीत्या रुग्णांवर उपचार करून त्यांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बीएनएस कलम ३१८ (४), ३१९ (२), वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१ चे कलम ३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घरोघरी जाऊन रुग्णांवर उपचार करित होता. रावेत पोलीस तपास करित आहेत.

तळेगाव दाभाडे येथे भीषण अपघात

दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे वाहन चालवून उजवे वळण घेताना दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. ही घटना रविवारी (१६ ऑगस्ट) सायंकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास जुना पुणे-मुंबई हायवेवर, सीआरपीएफ गेट नंबर दोनजवळ, तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी एका तरुणाविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वडगाव कडून मुंबई-पुणे हायवे रोडने येत होते. सीआरपीएफ गेट जवळ आल्यानंतर आरोपीने त्याच्या दुचाकीवरून अचानक वडगावच्या दिशेने उजवे वळण घेतले. यावेळी त्याने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांना गंभीर दुखापत झाली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करित आहेत.

तरुणाला जबरदस्तीने कारमध्ये बसवून लुटले

मनी ट्रान्सफर करण्यासाठी जाणाऱ्या एका तरुणाला अडवून जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (१५ ऑगस्ट) रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास चिखली येथे घडली. याबाबत २५ वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी जात असताना तिन्ही आरोपींनी त्यांना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवले. काही अंतर गेल्यावर त्यांना कारमधून खाली उतरवून त्यांच्या जवळील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि २० हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

अमली पदार्थ विक्री प्रकरणी एकाला अटक

विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगलेला एम.डी. (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करित एका तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (१५ ऑगस्ट) सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली. सागर अशोक शिंदे (३४, शिरगाव, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अक्षय कांबळे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर शिंदे याच्याकडे २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा एकूण २३.५५ ग्रॅम एम.डी. हा अमली पदार्थ आढळून आला. तो हा पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्री करण्यासाठी स्वतःजवळ बाळगून आला होता. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.