पिंपरी : केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (सीबीएन) राबविलेल्या मोहिमेत दिघी येथील एका घरातून मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थ निर्मितीसाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. राजस्थानातील मुख्य सूत्रधाराने एमडी उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे आपल्या दिघीतील नातेवाईकाच्या निवासस्थानी ठेवली असल्याचे तपासात निदर्शनास आल्यानंतर ‘सीबीएन’ने पिंपरी- चिंचवड आणि जोधपूर येथे एकाचवेळी कारवाई केली.

मध्य प्रदेशातील नीमच येथील ‘सीबीएन’ पथकाने फेब्रुवारी २०२६ मध्ये मंदसौर येथे ८.१७ किलो मेफेड्रोन जप्त केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासात महू (मध्य प्रदेश) येथे सुरू असलेल्या बेकायदा एमडी उत्पादन केंद्रावर छापा टाकून ४३.८२ किलो मेफेड्रोन, २६१.३२ किलो प्रिकर्सर केमिकल्स आणि उत्पादनासाठी लागणारी विविध उपकरणे जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीत मुख्य सूत्रधार राजस्थानातील जोधपूर येथे एमडी उत्पादनाशी संबंधित कारवाया करत असल्याचे निष्पन्न झाले.

तसेच, एमडी निर्मितीसाठी लागणारी काही अत्याधुनिक उपकरणे त्याने पिंपरी-चिंचवड येथील दिघी परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाच्या घरात ठेवली असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यानुसार, सीबीएनने जोधपूर आणि पिंपरी-चिंचवड येथे एकाचवेळी छापे टाकले. दिघीतील कारवाईत एमडी उत्पादनासाठी लागणारी विविध यंत्रसामग्री, उपकरणे आणि साहित्य सीलबंद खोक्यांमधून जप्त करण्यात आले. तपासात संबंधित नातेवाईकांना या उपकरणांचा नेमका उद्देश माहिती नसल्याचे स्पष्ट झाल्याने कोणालाही अटक करण्यात आली नसल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सांगितले.

दिघीत कोणतीही प्रयोगशाळा नाही

समाजमाध्यमावर दिघी-भोसरी येथे एमडीची अत्याधुनिक उत्पादन प्रयोगशाळा सुरू असल्याबाबतचे संदेश प्रसारित झाले होते, मात्र सीबीएनने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार पुण्यात कोणतीही कार्यरत एमडी उत्पादन प्रयोगशाळा आढळून आलेली नाही. येथे केवळ एमडी निर्मितीसाठी आणून ठेवलेली उपकरणे जप्त करण्यात आली असून, प्रत्यक्ष उत्पादन सुरू असल्याचे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

उसने घेतलेले पैसे मागितल्याच्या रागातून भावाचा खून

लोकांकडून उसने घेतलेले पैसे परत मागण्यासाठी लोक घरी येत असल्याचे सांगून वाद घातल्याने सख्ख्या भावाने आपल्या मोठ्या भावावर चाकूने वार करून खून केला. ही घटना मंगळवारी (१४ जुलै) पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास माळीनगर, देहूगाव येथे घडली. या प्रकरणात कुंदन हिरालाल भगत (२३, माळीनगर, देहूगाव, मूळगाव – संगमनगर खोतवाडी, हातकणंगले, कोल्हापूर) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार घनश्याम राजेंद्र कुदळे (२०, माळीनगर, देहूगाव, मूळगाव – इचलकरंजी, कोल्हापूर) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विनायक राजेंद्र कुदळे (२४) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक याने लोकांकडून उसने पैसे घेतले होते. पैसे मागण्यासाठी लोक घरी येत असल्याचे त्याचा भाऊ घनश्याम याने त्याला सांगितले. या कारणावरून दोघा भावांमध्ये जोरदार वाद झाला. याच वादाच्या भरात आरोपीने भाजी कापण्याचा चाकू विनायक याच्या छातीच्या डाव्या बाजूला खुपसला. यामध्ये विनायक गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

बँकेने सील केलेल्या मिळकतीचे कुलूप तोडून अनाधिकृत प्रवेश

बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या मिळकतीचे सील आणि दरवाजाचे लॉक तोडून आत अनाधिकृतपणे प्रवेश करत नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना ३ जुलै ते ६ जुलै दरम्यान मोशीत घडली. याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मिळकत ताब्यात घेतली होती. मिळकतीला सील लावले होते. मात्र, आरोपींनी बँकेचे सील आणि दरवाजाचे लॉक बेकायदेशीरपणे तोडले. त्यांनी त्या मिळकतीमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला, तसेच तेथे बँकेने लावलेला बॅनर फाडून नुकसान केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

कारमध्ये लोखंडी कोयता बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (१३ जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली. आदित्य बाबासाहेब शेंडगे (२२, पिंपळे सौदागर) आणि आनंद गोविंद कांबळे (२८, नखातेवस्ती, रहाटणी) या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रमेश ब्राम्हण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीमध्ये लोखंडी कोयता बाळगला. आरोपींकडे बेकायदेशीर असतो असल्याची माहिती काळेवाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून कोयता जप्त केला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.

बटाट्याची भाजी आवडली नाही म्हणून कामगाराला मारहाण

जेवणात बनवलेली बटाट्याची भाजी चांगली लागली नसल्याने दुसरी भाजी मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाने रंगकाम करणाऱ्या व्यक्तीला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (१३ जुलै) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास राक्षेवाडी, चाकण येथे घडली.

या प्रकरणात दोघांविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी बटाट्याच्या भाजीची चव चांगली नसल्याने त्यांनी दुसरी चांगली भाजी खाण्यासाठी द्या, असे आरोपीला सांगितले. यावरून आरोपीने आपल्या भावाला फोन करून बोलावून घेतले आणि भावाच्या चिथावणीवरून फिर्यादीला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या ओठांना गंभीर दुखापत होऊन टाके पडले असून, उजव्या हाताच्या तीन बोटांना आणि दातांना दुखापत झाली आहे. उत्तर चाकण पोलीस तपास करीत आहेत.