पिंपरी : बनावट ई-मेल आयडी तयार करून दोन कंपन्यांमधील व्यवहारात हस्तक्षेप करत एकाकडून ८ लाख ८१ हजार ९४२ रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चाकण परिसरातील कंपनीत ऑनलाइन व्यवहारादरम्यान घडला.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका कंपनीतील पुरुष फिर्यादीने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कंपनीचा अधिकृत ई-मेल आयडी वापरून चीनमधील कंपनीशी पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने बनावट व मूळ कंपनीसारखे दिसणारे ई-मेल आयडी तयार करून व्यवहारात प्रवेश केला.
त्यानंतर कंपनीच्या नावाने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. या फसवणुकीत कंपनीकडून ५२०० व ५०४५.७ डॉलर इतकी रक्कम घेऊन भारतीय चलनामध्ये एकूण ८ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार करण्यात आला. चाकण उत्तर पोलीस तपास करत आहेत.
भरधाव मिक्सरने घेतला आणखी एका तरुणीचा बळी
बंदी झुगारून शहरात आलेल्या काँक्रिट मिक्सर ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना सुसगाव येथे गुरुवारी शिवबा चौक परिसरात घडली.
अंजली शंकर साळवे (वय १८) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिच्या वडिलांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली साळवे ही दुचाकीवरुन घरी जात असताना काँक्रिट मिक्सर ट्रकने भरधाव वेगाने येऊन तिच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ज्या रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे. त्या रस्त्यावर निष्काळजीपणे ट्रक चालविल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बावधन पोलीस तपास करत आहेत.
पैसे न दिल्याने व्यावसायिकास बेदम मारहाण; चौघे अटकेत
मद्य पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना दापोडी येथे मंगळवारी (दि. ३ मार्च) रोजी सायंकाळी सव्वाचार वाजताच्या सुमारास घडली.
गणेश भिसे, राम अशोक कांबळे (वय २४, रा. सिद्धार्थनगर, दापोडी), संकेत भालचंद्र वाघमारे (वय २०, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) व वेदांत मोरे (वय २४, रा. सिद्धार्थनगर, दापोडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत प्रांशु शाम बारमेडा (वय २५, रा. सांगवी, पुणे) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादीकडे मद्य पिण्यासाठी एक हजार रुपये मागितले. मात्र फिर्यादी बारमेडा यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी “आम्ही इथले बाप आहोत” असे म्हणत फिर्यादीला मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या नाकाला गंभीर दुखापत होऊन नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
चऱ्होलीत गांजासह एकाला अटक
अवैधरित्या गांजा विक्रीसाठी ठेवलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई ६ मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास चऱ्होली येथे करण्यात आली.महादेव जीवन शिंदे (वय ५२, रा. वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सोमनाथ बाळू खळसोडे (वय ३८) यांनी शुक्रवारी (दि. ६) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे ३६२ ग्रॅम वजनाचा अंदाजे १८ हजार १०० रुपये किंमतीचा गांजा विक्रीसाठी बाळगलेला आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून हा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
