पिंपरी : रस्त्यात उभे असलेल्या टोळक्याला बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने एका तरुणाला कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार (१५ एप्रिल) रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास टॉवर लाईन, चिखली येथे घडली. या प्रकरणात २० वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार विधीसंघर्षित बालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांनी रस्त्यात थांबलेल्या मुलांना हॉर्न वाजवून बाजूला होण्यास सांगितले. याचा राग येऊन आरोपींनी “आम्ही या भागातील भाई आहोत” असे म्हणत फिर्यादीला पकडून ठेवले आणि त्यांच्या डोक्यावर व हातावर कोयत्याने वार केले. तसेच परिसरात कोयता फिरवून दहशत निर्माण केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
सांगवी परिसरात १४ किलो गांजासह एकाला अटक
औंध जिल्हा रुग्णालयाजवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (१५ एप्रिल) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी येथील पॉवर हाऊसजवळ करण्यात आली.
या प्रकरणात सहाय्यक उपनिरीक्षक निशांत काळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश कैलास चव्हाण (३०, गणेगाव खलसा, शिरूर) याला अटक केली असून एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गणेश चव्हाण याच्याकडून ७ लाख ९० हजार रुपये किमतीचा १४ किलो गांजा, एक मोटारसायकल आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. हा गांजा त्याने ज्याच्याकडून विक्रीसाठी आणला होता. त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
भोसरीत तीन पत्ती जुगारावर छापा
मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (१६ एप्रिल) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जुना कचरा डेपो रोड, सदगुरूनगर, भोसरी येथे करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साळवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वतःच्या फायद्यासाठी तीन पत्ती जुगार खेळत असताना पोलिसांना आढळून आले. त्यांच्याकडून ४ लाख १६ हजार ८९० रुपयांचे जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
निगडीत अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई बुधवारी (१५ एप्रिल) रात्री १० वाजण्याच्या सुमारास भक्ती-शक्ती चौकाखालील भुयारी मार्गाजवळ करण्यात आली.
पोलीस कॉन्स्टेबल दीपक पिसे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका विधीसंघर्षित बालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा शस्त्र विक्रीच्या उद्देशाने भक्ती शक्ती चौकाच्या भुयारी पुलाजवळ आला होता. याबाबत माहिती मिळाली असता निगडी पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. निगडी पोलीस तपास करत आहेत.
दोन महिलांवर कारवाई
रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना अडवून अश्लील हावभाव आणि शब्दांचा वापर करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवार (१६ एप्रिल) सायंकाळी दिघी-आळंदी रोडवर करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल योगेश शेळके यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलांनी फिर्यादी आणि इतर नागरिकांना अश्लील शब्दांत बोलून सार्वजनिक सभ्यतेचा भंग केला. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करून दहशत पसरवल्याबद्दल पिटा ॲक्टनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.
