पिंपरी : एका तरुणाला भेटायला बोलावून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (२६ मे) रोजी रात्री साडेआठ वाजता चिखली येथील संविधान चौकात घडली आहे.
याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला चिखली येथील संविधान चौकात भेटण्यासाठी बोलावून घेतले. तिथे विनाकारण वाद घालून आरोपीने त्याच्याकडील कोयत्याने डोक्यावर, डाव्या हाताच्या पंजावर आणि उजव्या हाताच्या बोटांवर वार करून गंभीर दुखापत केली. चिखली पोलीस तपास करत आहे.
मांजराच्या वादातून वृद्ध महिलेला मारहाण
पाळीव मांजरी घराच्या छतावर येण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका वृद्ध महिलेस मारहाण केली. ही घटना मंगळवारी (२६ मे) रात्री नऊ वाजताच्या सुमारास ताथवडे गावठाण येथे घडली.
याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची पाळीव मांजरे फिर्यादी यांच्या घरावर येत असल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपी महिला आणि तिच्या मुलीने फिर्यादी यांचे केस ओढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी पुरुष आरोपीने फूटपाथवरील वीट उचलून फिर्यादी यांच्या कपाळावर मारून त्यांना रक्तबंबाळ केले. वाकड पोलीस तपास करत आहेत.
रस्त्यावर पाणी मारल्याच्या कारणावरून चौघांवर दगड, हातोडी हल्ला
रस्त्यावर पाणी मारण्याच्या किरकोळ कारणावरून शेजार्यांनी एका कुटुंबावर हातोडी आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात चारजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (२९ मे) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली.
याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर पाणी मारल्याने पाणी घरात येते, असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. वादादरम्यान आरोपींनी फिर्यादी यांच्या आईला धक्का देऊन त्याला पकडून ठेवले, तर महिलेने फिर्यादीच्या डोक्यात हातोडीने व दगड फेकून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या मामांना, भावाला आणि पत्नीलाही आरोपींनी दगडाने व हाताने बेदम मारहाण केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
भोसरी येथील दिघी रोडवर पोलिसांनी मध्यरात्री एका १९ वर्षीय तरुणाला घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.
क्रिश सुरेंद्र सिंग (१९, गणेशनगर, बोपखेल) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल वैभव वाटकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील सॅण्डवीक कॉलनी समोरील रस्त्यावर क्रिश सिंग हा संशयास्पद रितीने वावरताना आढळला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना कोयता मिळून आला. पोलिसांनी कोयता जप्त करत क्रिश याला अटक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू
भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणार्या ७९ वर्षीय वृद्ध महिलेला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना १३ मे रोजी घडली.
याप्रकरणी २० वर्षीय तरुणाने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आजी मनुबाई प्रल्हाद साकळे (वय ७९) या रस्त्यावरील दुभाजकातील झाडांना पाणी घालण्याचे काम करत होत्या. त्या जेवणाचा डबा घेण्यासाठी रस्ता ओलांडत असताना, थरमॅक्स चौकाकडून आलेल्या आरोपीच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने मनुबाई यांचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
