पिंपरी : डेटिंग अॅपवरून मैत्री करण्याचे आमिष दाखवून तरुणाला बोलावून घेतले. त्यानंतर मारहाण करून रोख रक्कम, मोबाइल आणि ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून लुटले. पोलिसात तक्रार दिल्यास सोडणार नसल्याची धमकी दिल्याचा प्रकार चाकण परिसरात घडला.
याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला चाकण येथील चक्रेश्वर मंदिराच्या बाजूला असलेल्या गार्डनजवळ मैत्री करण्यासाठी बोलावले होते. फिर्यादी तेथे दुचाकीवरून पोहोचले असता, त्या ठिकाणी आलेल्या तरुणाने त्यांच्या गाडीची चावी काढून घेतली व त्यांना बाजूला नेले. त्यावेळी तिथे आलेल्या इतर साथीदारांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील रोख १८ हजार रुपये, पॉवर बँक आणि गुगल पेद्वारे २६ हजार रुपये स्कॅन करून जबरदस्तीने ट्रान्सफर करून घेतले. पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. चाकण उत्तर पोलीस करीत आहेत.
डिजिटल अटकेची भीती दाखवून पावणेदोन लाखांची फसवणूक
पेन्शनचे लाइफ सर्टिफिकेट अपडेट करण्याच्या बहाण्याने मोबाइलवर बनावट अॅप पाठवून एका ज्येष्ठ नागरिकाची एक लाख ९० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. हा प्रकार बावधन येथे घडला.
फिर्यादी यांच्या फेसबुक अकाऊंटवर पेन्शन लाइफ सर्टिफिकेट काढण्याबाबत मेसेज आला होता. त्यानंतर आरोपीने त्यांच्या व्हॉट्सपवर संपर्क साधून सर्टिफिकेट अपडेट करण्याचा बहाणा केला. आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवर बनावट एपीके फाइल डाऊनलोड करण्यास भाग पाडले. फिर्यादीने ही फाइल इन्स्टॉल करताच सायबर चोरट्याने त्यांच्या बँक खात्यावर नियंत्रण मिळवून खात्यातून एक लाख ९० हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
तोतया पोलिसांनी वृद्धाची सोन्याची अंगठी पळवली
‘आम्ही पोलीस अधिकारी आहोत, मुंबईत खून झाला असून चाकूचा शोध घेत आहोत अशी बतावणी करून एका वृद्ध नागरिकाची सोन्याची अंगठी हातचलाखीने लंपास केली. ही घटना देहूरोड येथे घडली.
या प्रकरणी दोन तोतया पोलीस अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे पायी जात असताना दोन चोरटे त्यांच्याजवळ आले. त्यांनी हम पुलिस ऑफिसर है, मुंबई में खून हुआ है, जिससे खून हुआ है वो चाकू की तलाशी शुरू है असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हातातील सोन्याची अंगठी काढून कागदात ठेवण्यास सांगितले व हातचलाखी करून सहा ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेऊन पळ काढला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
अॅमेझॉन स्टोअरमधील कर्मचार्याला सिमेंट गट्टूने मारहाण
अॅमेझॉन स्टोअरमध्ये काम करणार्या कर्मचार्याला कामाच्या वादातून शिवीगाळ करत खुर्ची आणि सिमेंटच्या काँक्रीटच्या दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही माण परिसरात घडली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे स्टोअरमध्ये लॅपटॉपवर काम करत असताना आरोपी तेथे आले. त्यातील तीन दिवसांपूर्वी कामाला लागलेल्या मुलाने फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण केली. तू जास्त शहाणा झाला आहेस का? आमच्या मुलांना लोडरचे काम करण्यास विरोध करणारा तू कोण? अशी धमकी देत आरोपींनी लोखंडी पाय असलेली प्लास्टिकची खुर्ची फिर्यादीच्या अंगावर फेकून मारली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी बाहेर पडताना सिमेंट काँक्रीटचा दगड फिर्यादीच्या कपाळावर जोरात मारून त्यांना गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार
रस्त्यावर मित्रांसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणावर तिघांनी मिळून शिवीगाळ करत धारदार कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना पिंपरीत घडली.
याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा रस्त्यावर मित्रांसोबत बोलत उभा होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी अचानक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादावादी वाढल्यानंतर एकाने आपल्या जवळील धारदार कोयता काढून एका मुलावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
