पिंपरी : आईस्क्रीम खाण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाला जुन्या कारणावरून चौघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (१ मार्च) रात्री ११ वाजेच्या सुमारास मॅगझिन चौक, दिघी येथे घडली.

या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते. तिथे पाणीपुरी विक्री करणाऱ्याचे महिन्याचे पैसे दिले नाहीत या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला. या वादातून आरोपींनी फिर्यादीला हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या डाव्या पायाच्या करंगळीचे हाड फॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले. दिघी पोलीस तपास करत आहेत.

मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एक जखमी

भरधाव वेगात येणाऱ्या मोटारीने समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (३ मार्च) सकाळी १० वाजेच्या सुमारास बधलवाडी ते नवलाख उंबरे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

चंद्रकांत शिवाजी हेमनार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र चंद्रकांत हे दोघे ओला इलेक्ट्रिक स्कूटरवरून कामावर जात होते. यावेळी समोरून येणाऱ्या मोटारीच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात गाडी चालवत फिर्यादीच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात फिर्यादी जखमी झाले असून त्यांचा मित्र चंद्रकांत हेमनार यांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

बेकायदेशीरपणे मद्याची वाहतूक आणि विक्री प्रकरणी पोलिसांच्या कारवाया

धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीरपणे मद्याची वाहतूक आणि विक्री केल्याप्रकरणी निगडी, काळेवाडी आणि चिखली येथे कारवाया करत बेकायदेशीर मद्य जप्त करण्यात आले. यामध्ये एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टेंपोमधून बेकायदेशीर मद्याची वाहतूक

अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून विनापरवाना मद्याची वाहतूक करणाऱ्या एका टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. मंगेश दयाराम नेरकर (४५, रुपीनगर, तळवडे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई सोमवारी (२ मार्च) दुपारी एक वाजेच्या सुमारास चिखली येथील कृष्णानगर बसस्टॉप जवळ करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई कपिलेश इगवे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याच्याकडून ४७ हजार ९२५ रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. हा माल त्याने निगडी येथील एका वाईन शॉपमधून आणल्याचे तपासात समोर आले आहे. चिखली पोलीस तपास करत आहेत.

घराच्या आडोशाला गावठी दारूची विक्री

आपल्या घराच्या आडोशाला बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारू साठवून विक्री करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी (३ मार्च) सकाळी ११ वाजेच्या सुमारास थेरगाव येथील संदीप नगर येथे घडली. या प्रकरणी संबंधित महिलेच्या विरोधात काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी २५ लिटर गावठी दारू जप्त केली. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

विदेशी मद्याची तस्करी

मालकाच्या फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या परदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका हॉटेल कॅशियरला पोलिसांनी पकडले. ही कारवाई मंगळवारी (३ मार्च) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास निगडी येथील थरमॅक्स चौक ते साने चौक रोडवर करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई सुनील चौधरी यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॅशिअरसह हॉटेल मालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या मालकाच्या सांगण्यावरून दुचाकीवरु परदेशी मद्याच्या बाटल्या घेऊन जात होता. पोलिसांनी त्याला अडवून तपासणी केली असता ५९ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये २७ परदेशी मद्याच्या बाटल्या आणि एका दुचाकीचा समावेश आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.