पिंपरी : ‘क्राईम ब्रँच अधिकारी’ असल्याचे भासवून मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवत महिलेकडून ६९ लाख रुपये उकळण्‍यात आले. हा प्रकार जुनी सांगवी येथे १३ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२६ दरम्‍यान घडला आहे. एका महिलेने याबाबत सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२६ दरम्‍यान आरोपींनी आपसांत संगनमत करीत फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. तुमच्‍या आधारकार्डवर सिम घेतल्याचे सांगून त्‍यावरून अश्लील संदेश पाठविल्‍याच्‍या अनेक तक्रारी आल्‍याचे सांगितले. तसेच मनी लॉन्डरिंग प्रकरणात तुमचे नाव आले असून तुम्‍हाला अटक होईल अशी भीती दाखवून महिलेकडून विविध खात्यांमध्ये ६९ लाख रुपये जमा करून घेतले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

यात्रेत दागिण्‍यांची चोरी; तीन महिलांना अटक

यात्रेत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्‍कम चोरी करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ मंदिराच्‍या यात्रेत गुरुवारी (दि. १९) सायकाळी साडेपाचच्‍या सुमारास घडली.

सोनाली उर्फ सुनिता जाधव (वय ३२), वनिला संजय जाधव (वय २५) आणि रेनुका राहूल पवार (वय ३३, सर्व रा. चंदननगर, पुणे) अशी अटक केलेल्या महिला आरोपींची नावे आहेत. योगिता प्रमोद भदाणे (वय २९, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी शुक्रवारी याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी गुढीपाडव्‍याच्‍या दिवशी तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ महाराजांची यात्रा होती. या यात्रेतील गर्दीचा फायदा घेत सायंकाळी साडेपाच वाजताच्‍या सुमारास आरोपी महिलांनी आपसांत संगनमत करून फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे एक लाख ५२ हजार रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीनही महिला आरोपींना अटक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

प्लॉट डेव्हलपमेंटच्या नावाखाली तीन कोटींची फसवणूक

प्लॉट विकासाच्या व्यवहारात विश्वास संपादन करून तब्बल दोन कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. तसेच बांधकाम साईटवर दादागिरी व नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मुळशी तालुक्‍यातील जांबे येथे घडली. याबाबत ५१ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी प्लॉट विकासासाठी जागा देऊन विश्वास संपादन केला. मात्र विकास पूर्ण झाल्यानंतर अॅग्रीमेंट करण्यास टाळाटाळ करत २.९४ कोटींची फसवणूक केली. तसेच साईटवर घुसून फ्लॅट्सचे कुलूप तोडणे, सीसीटीव्ही तोडणे, वायर कापणे, बोरवेल बंद करणे असे प्रकार करून सुमारे ४० लाखांचे नुकसान केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्रासह दगडाने हल्ला

जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी करण्‍यात आले. याप्रकरणी चार जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास राऊतनगर, साईनगर येथे घडली.

जखमी झालेल्या २५ वर्षीय तरुणाने देहूरोड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्‍या सुमारास जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीवर अचानक हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून उजव्या हाताला जखमी केले. फिर्यादी यांनी आरोपींच्‍या तावडीतून सुटका करीत पळून जात असताना आरोपींनी केलेल्‍या दगडफेकमध्‍ये फिर्यादी यांच्‍या डोक्याला दुखापत झाली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

लॉजमध्ये देहविक्री; मॅनेजर अटकेत

लॉजमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहविक्री करण्यास भाग पाडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करीत लॉज मॅनेजरला अटक केली आहे. ही कारवाई आळंदी फाटा परिसरातील एका लॉजवर करण्‍यात आली.

दिपक मधुकर जाधव (वय २५, रा. दिघी. मूळ रा. इच्‍छापूर, ता. शहापूर, जि. ब-हाणपूर) असे अटक केलेल्‍या आरोपी लॉज मॅनेजरचे नाव आहे. पोलीस हवालदार संदीप दोडके (वय ४०) यांनी शुक्रवारी (दि. २०) आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लॉजमध्ये चार महिलांकडून देहविक्री करवून घेत होता. त्यातून स्वतःचा फायदा करून घेत होता. पोलिसांनी छापा टाकून कारवाई करत आरोपीला अटक केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.