पिंपरी : निगडी येथील यमुनानगर परिसरात एका हॉटेल चालक महिलेला मी गुन्हेगार आहे अशी धमकी देऊन एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना शनिवारी (४ एप्रिल) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणात २३ वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल प्रल्हाद देवकर (३२, बोदवड, जि. जळगाव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल देवकर हा फिर्यादीच्या हॉटेलमध्ये आला. त्याने ‘मी गुन्हेगार आहे’ असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ केली. हॉटेल व्यवस्थित चालवायचे असेल तर एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्याने केली. पैसे न दिल्यास हॉटेल तोडून टाकण्याची आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ७५ लाखांची फसवणूक

ताथवडे परिसरात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ७५ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली.

या प्रकरणात एका व्यक्तीने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मोबाइल क्रमांकधारकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीला एका नामांकित सिक्युरिटीज कंपनीचे सल्लागार असल्याचे भासवले. त्यांची कंपनी सेबी रजिस्टर आहे असे सांगून फिर्यादीला शेअर मार्केट गुंतवणुकीसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील केले. तिथे विविध आयपीओ आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवण्यात आले. सेबी आणि नामांकित कंपन्यांचे बनावट शिक्के असलेले लेटर दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने ७५ लाख ५० हजार रुपये भरल्यानंतर आरोपींनी ती रक्कम परत न करता त्यांची फसवणूक केली. सायबर पोलीस तपास करत आहेत.

पेंटिंगचे ब्रश फेकून दिल्याने पत्नीला मारहाण

मद्याच्या नशेत असलेल्या पतीने पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात का फेकले, असे म्हणत पत्नीला मारहाण केली. ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री १० वाजेच्या सुमारास थेरगाव येथे घडली. या प्रकरणी जखमी महिलेने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी किशोर सुभाष वाघमारे (३५, थेरगाव) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किशोर वाघमारे याने मद्याच्या नशेत घरी येऊन त्याची पत्नी फिर्यादी सोबत वाद घातला. फिर्यादीने त्याचे पेंटिंगचे ब्रश कचऱ्यात फेकले, असा संशय घेऊन त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतापाच्या भरात त्याने घरातील गॅस शेगडीवरचे लोखंडी स्टँड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.

देहूगाव येथे रिक्षा चालकासह दोघांना मारहाण

देहूगाव परिसरात जुन्या वादातून एका रिक्षा चालकाला अडवून त्याला आणि त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण करित जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवारी (७ एप्रिल) घडली. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणाने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला हाक मारून थांबवले. त्यानंतर सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यांना व त्यांच्या मित्राला मारहाण केली. यावेळी आरोपीने हातातील हत्याराने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंजावर वार करून त्यांना जखमी केले. “तुला बघून घेतो” अशी धमकी देऊन आरोपी तिथून पसार झाले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.

जेवणाचे बिल मागितल्याने मॅनेजरला मारहाण

खराळवाडी येथील एका हॉटेलमध्ये जेवणाचे बिल मागितल्याचा राग धरून एका ग्राहकाने हॉटेलच्या मॅनेजरला गाडीच्या चावीने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (६ एप्रिल) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली.या प्रकरणी हॉटेल मॅनेजरने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सुरुवातीला हॉटेलमधील वेटरला शिवीगाळ केली. त्यानंतर मॅनेजरने त्याला जेवणाचे बिल मागितले असता, आरोपीने रागाच्या भरात आपल्या जवळील दुचाकीची चावी मॅनेजरच्या मानेवर आणि डोक्यावर मारली. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.

चऱ्होली परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

चऱ्होली बुद्रुक येथे बेकायदेशीरपणे गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (७ एप्रिल) दुपारी दीड वाजेच्या सुमारास चऱ्होली ते लोहगाव रस्त्याच्या कडेला करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई शरद विंचू यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आर्यन कृष्णा रसाळ (१९, चऱ्होली बु.) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्यन रसाळ हा चऱ्होली परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५४८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे २७ हजार ४०० रुपये इतकी आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.