पिंपरी : मोटारीवर बेकायदेशीरपणे ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य – आमदार’ असा लोगो लावून फिरणाऱ्या दोघांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. ही कारवाई कस्‍पटेवस्‍ती, वाकड येथे गुरुवारी करण्यात आली.

याबाबत सांगवी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई सुधीर कैलास साबळे यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिंपळेसौदागर आणि भोसरीतील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे वस्ती येथील एका हॉटेलसमोर काळ्या काचा असलेली मोटार तपासणीदरम्यान आढळली. मोटारीवर पांढऱ्या-हिरव्या रंगाचा अशोक स्तंभासह बनावट ‘आमदार’ असा लोगो लावलेला होता. स्वतः किंवा कुटुंबात कोणीही आमदार नसताना फसव्या उद्देशाने हा लोगो लावल्याचे निष्पन्न झाले. वाकड पोलीस करित आहेत.

शाळेचे वर्कबुक न घेतल्याने विद्यार्थिनीला मारहाण

शाळेचे वर्कबुक का घेतले नाही या किरकोळ कारणावरून आठ वर्षांच्या बालिकेला शिक्षिकेने वर्गात मारहाण केली. ही घटना इंदिरानगर, पिंपरी येथे घडली.

या प्रकरणी संबंधित शाळेच्या शिक्षिकेविरोधात बाल न्याय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विद्यार्थीनीच्या पालकाने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आठ वर्षीय मुलगी खासगी शाळेत शिक्षण घेत आहे. शाळेचे वर्कबुक का विकत घेतले नाही यावरून संतापलेल्या शिक्षिकेने विद्यार्थिनीच्‍या गालावर जोरदार चापट मारली तसेच उलट्या हाताने तोंडावर मारहाण केली. यामुळे बालिकेला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. संत तुकारामनगर पोलीस करित आहेत.

देहूरोड कटक मंडळाच्या अभियंत्याला शिवीगाळ

देहूरोड कटक मंडळाच्या कार्यालयात विनापरवाना प्रवेश करून कनिष्ठ अभियंत्याला अरेरावी करत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्‍यात आला. याप्रकरणी अभियंत्याने देहूरोड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कार्यालयात बेकायदेशीरपणे घुसले. फिर्यादी यांनी विचारणा केली असता, “तू कोण मला सांगणारा, तू पोलीस, मिलेट्री किंवा त्‍यांच्‍या बापाला बोलव, मी येथून हलणार नाही,” अशी अरेरावीची भाषा वापरली. तसेच फिर्यादीवर धावून जात हल्‍ला करण्याचा प्रयत्न केला व जोरजोरात गोंधळ घालून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. देहूरोड पोलीस करित आहेत.

एमडी ड्रग्जसह डिलिव्हरी बॉय अटकेत

पिंपळे गुरव परिसरात विक्रीसाठी आणलेले १ लाख १४ हजार रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज सांगवी पोलिसांनी जप्त करून एका डिलिव्हरी बॉय अटक केली. ही कारवाई बुधवारी ( ९ सप्‍टेंबर) रोजी सायंकाळी पावणे आठ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.

या प्रकरणी आर्यन विजय खेडेकर (वय १९, धंदा – डिलिव्हरी बॉय, रा. पिंपळे गुरव, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक निशांत रावसाहेब काळे यांनी सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायनासोर गार्डनशेजारील पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ एक तरुण अमली पदार्थ घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपी आर्यन खेडेकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत १ लाख १४ हजार रुपये किमतीचे ५.७ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सांगवी पोलीस तपास करित आहेत.

आधारकार्डातील नाव पूर्ववत करण्‍यासाठी खंडणी मागणाऱ्यावर गुन्‍हा

आधार कार्डातील नावात परस्पर बदल करून आर्थिक अडचणीत आणत नाव पूर्ववत करण्यासाठी ४० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्यावर रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी ३७ वर्षीय व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या ओळखपत्रावरील नावात संमतीशिवाय परस्पर बदल करून त्यांची फसवणूक केली. नाव पूर्ववत करण्यासाठी त्याने ४० हजार रुपयांची खंडणी मागितली व पैसे न दिल्यास फिर्यादीला जिवे मारण्याची तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या ओळखपत्रातही बदल करण्याची धमकी दिली. रावेत पोलीस तपास करित आहेत.

माहिती अधिकाराचा धाक दाखवून खंडणी मागणारी टोळी ताब्यात

माहिती अधिकारातून कागदपत्रे काढून काम बंद पाडण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ठाण्याच्या टोळीला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पकडले. ही घटना गेल्‍या सहा महिन्‍यांपासून ते १० सप्‍टेंबर २०२६ या कालावधीत घडली आहे.

या प्रकरणी टोळीतील चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत एका व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या ‘सुवर्णा फाईब्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे काम बंद पाडण्याची धमकी देऊन पाच कोटींची खंडणी मागितली होती. त्यानंतर कारमधून येत खंडणीपोटी २५ लाखांची रोकड स्वीकारताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करत आहेत.