पिंपरी : पिंपरी येथील एका मॉलमध्ये पोलिसांनी छापा टाकून एका कंपनीचे बनावट साहित्य विकणाऱ्या आठ दुकानदारांवर कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १३ लाख ४८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (२९ मार्च) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी ४९ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका कंपनीची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या नावाचे आणि चिन्हाचे बनावट मोबाइल डिस्प्ले, मोबाइल कव्हर आणि चार्जर विक्रीसाठी ठेवले होते. पोलिसांनी मॉलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत १३ लाख ४८ हजार रुपये आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
बनावट कागदपत्रांच्या आधारे जमिनीच्या आरक्षणात फेरफार; सहा जणांवर गुन्हा
च-होली बुद्रुक येथील वडमुखवाडी भागात जमिनीवरील हॉस्पिटलचे आरक्षण बदलण्यासाठी बनावट सह्या आणि कागदपत्रे सादर करून फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ३० ऑगस्ट २०१९ ते १८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत वडमुखवाडी येथे घडला.
याबाबत ६५ वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादीची मालमत्ता बळकावण्याच्या उद्देशाने फिर्यादी आणि त्यांचे पती यांच्या बनावट सह्या केल्या. या बनावट कागदपत्रांच्या आधारे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागाकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर केले. जमिनीवरील हॉस्पिटलचे आरक्षण बदलण्यासाठी हा बनावट दस्तऐवज वापरण्यात आला. दिघी पोलीस तपास करत आहेत.
बनावट कपडे जप्त; एकावर गुन्हा दाखल
नामवंत कंपनीचा बनावट लोगो वापरून कपड्यांची विक्री करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी येथील साई चौकात सोमवारी (३० मार्च) रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत ३८ वर्षीय व्यक्तीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला नोटीस बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिंपरीतील साई चौकातील एका दुकानात ही कारवाई करण्यात आली. आरोपी आपल्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने नामांकित कंपनीचा लोगो असलेले बनावट टी-शर्ट, हाफ पँट आणि ट्रॅक पँट विक्रीसाठी बाळगताना मिळून आला. पोलिसांनी ८६ हजार १८४ रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
भोसरीत तरुणाला उसाने बेदम मारहाण
एका रसवंती गृहासमोर जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन भावांना उसाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना भोसरी एमआयडीसी परिसरात रविवारी (२९ मार्च) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी २७ वर्षीय तरुणाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका रसवंती गृहासमोर हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या भावाने त्यांना फोन करून बोलविल्यामुळे ते आपल्या भावाला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी आपसांत संगनमत करून जुन्या भांडणाचा राग धरून हुज्जत घातली. “तू जास्त शहाणा झाला आहेस का?” असे म्हणत आरोपींनी रसवंतीवरील ऊस उचलून फिर्यादी आणि त्यांच्या भावाला बेदम मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
विद्यार्थ्याला लोखंडी खुर्चीने मारहाण
वाकड येथील एका महाविद्यालयाच्या कॅम्पसबाहेर जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याला लोखंडी खुर्चीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (३० मार्च) रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत २१ वर्षीय विद्यार्थ्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी हा हिंदीचा पेपर देऊन कॉलेजबाहेर येत होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या एका भांडणात मध्यस्थी केल्याचा राग आरोपींच्या मनात होता. “आमच्याकडे खुन्नसने का बघतोस?” असे म्हणत आरोपींनी त्याला मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करीत आरोपींनी त्यास लोखंडी खुर्चीने डोक्यात मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
उर्सेमध्ये गांजासह एकाला अटक
गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मावळ तालुक्यातील उर्से ते वारीवणा रोडवर सोमवारी (३० मार्च) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे.
गणेश खंडू मुळक (३६, विशालनगर, उर्से, ता. मावळ, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन काचोळे यांनी याप्रकरणी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास उर्से गावच्या हद्दीत शंभो पानटपरीच्या मागे ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडे सहा हजार रुपये किमतीचा हिरवट तपकिरी रंगाचा ओला गांजा आणि पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ११ हजार रुपयांचा माल मिळून आला. एनडीपीएस ॲक्टनुसार शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिरगाव परंदवाडी पोलीस तपास करत आहेत.
