पिंपरी : फोन करण्यासाठी मोबाइल घेऊन ओळखीच्या व्यक्तीनेच मोबाइलवरून बँक खात्यातील एका लाख रुपये ट्रान्सफर केल्याची घटना मारुंजीत घडली. या प्रकरणात ५६ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा आहे. तो त्यांच्या घरी आला होता.
फोन करण्यासाठी त्याने फिर्यादीकडे मोबाइल मागितला. फिर्यादीने विश्वासाने मोबाइल दिला असता, आरोपीने मोबाइलमधील बँकिंग अॅपचा वापर करून फिर्यादीच्या खात्यातून एक लाख आठ हजार ६९५ रुपये परस्पर ट्रान्सफर केले. पैसे काढून घेतल्यानंतर आरोपीने मोबाइल आणि रक्कमेचा अपहार केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून पाच लाखांची फसवणूक
अमेरिकेतील नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीला पाच लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधला.
त्याने अमेरिकेतील एका कंपनीत ‘सिनिअर डायरेक्टर’ या पदावर नोकरी देण्याचे फिर्यादीला आमिष दाखवले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून आणि बँक खात्याचे केवायसी झाले नसल्याचे भासवून फिर्यादीकडून पाच लाख ४४० रुपये उकळले. पैसे भरूनही नोकरी न मिळाल्याने फिर्यादीने आपले पैसे परत मागितले असता आरोपीने टाळाटाळ केली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
बनावट बूट विकणाऱ्यावर कारवाई
प्रसिद्ध कंपनीचा बनावट लोगो वापरून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका दुकानदाराला काळेवाडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.या प्रकरणात नीरजकुमार नरेंद्रसिंग दहीया (३८, गोविंदपुरम, गाझियाबाद, उत्तर प्रदेश) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विकास उर्फ विकी विनोदकुमार रामनानी (३०, विजयनगर, काळेवाडी, पुणे) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीरजकुमार हे कंपनीत मॅनेजर पदावर काम करतात. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीचा लोगो असलेले बनावट शूज, चप्पल आणि फ्लिप फ्लॉप विक्रीसाठी ठेवले होते. याबाबत कंपनीला माहिती मिळाली. कंपनीच्या वतीने नीरजकुमार यांनी परिसरात पाणी केली आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी धाड टाकून आठ लाख ३० हजार २५० रुपये किमतीचा बनावट माल जप्त केला आहे. बनावट उत्पादनांवर नामांकित कंपनीचा लोगो लावून ग्राहकांची आणि कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
चिंचवडमध्ये जुगार अड्ड्यावर धाड; सात जणांना नोटीस
पैशावर पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या सात जणांच्या टोळीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई सोमवारी वाल्हेकरवाडी येथील एका गोदामाबाहेर करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई उमेश वानखडे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथे आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी तीन पत्त्यांचा जुगार खेळत होते. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकून १५ हजार ६५० रुपयांच्या रोख रक्कमेसह या सर्वांना पकडले. पोलिसांनी आरोपींना कायदेशीर नोटीस बजावली आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
वाकड परिसरात ३२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकाला अटक
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका इसमाला हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तीन लाखांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास विनोदेवस्ती, वाकड येथील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अतुल शंकर बालगुडे (३५, पाथरगाव, कामशेत, मावळ) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस गस्तीवर असताना आरोपी संशयास्पदरीत्या कारमध्ये मिळून आला.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन लाख २० हजार रुपये किमतीचे ३२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हे अंमली द्रव्य सापडले. पोलिसांनी अमली पदार्थासह दोन मोबाईल, एक चारचाकी कार आणि रोख रक्कम असा एकूण सहा लाख ४४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.
