पिंपरी : पिंपरीतील एका रुग्णालयामध्ये मेडिकलचा मोठा व्यवसाय मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना २२ एप्रिल २०२४ पासून ते ११ मार्च २०२६ या कालावधीत पिंपरी आणि मोशी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात घडली.
याबाबत एका महिला फिर्यादीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. वकिल, एका महिलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला मेडिकलमध्ये मोठा परतावा मिळेल असे सांगून २३ लाख रुपये डिपॉझिट घेतले. मात्र व्यवसाय न झाल्याने फिर्यादीने पैसे परत मागितले असता आरोपीने टाळाटाळ केली. इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या बनावट सह्या करून नोटरीद्वारे खोटा तडजोड करारनामा तयार केला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे फिर्यादीचे मेडिकल लायसन्स रद्द करून आरोपीने स्वतःच्या पत्नीच्या आणि फार्मसिस्टच्या नावे नवीन परवाना मिळवून पुन्हा व्यवसाय सुरू केला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
टास्कच्या नावाखाली २७ लाखांची ऑनलाइन फसवणूक
शेअर बाजार किंवा ऑनलाइन टास्कच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे आमिष दाखवून निगडी प्राधिकरण परिसरातील एका महिलेची २७ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक झाली. ही घटना २५ एप्रिल २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत निगडी प्राधिकरण येथे घडली.
या प्रकरणी एका व्यक्तीने रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या पत्नीला विश्वासात घेऊन ऑनलाइन गुंतवणुकीच्या बहाण्याने दिशाभूल केली. वेगवेगळ्या बँकांमधील खात्यांमधून २७ लाख ७२ हजार ४७ रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यक्तीने पोलिसात धाव घेतली. रावेत पोलीस तपास करत आहेत.
हळद खरेदीच्या करारात व्यापाऱ्याची साडेअकरा लाखांची फसवणूक
व्यावसायिक कराराचा भंग करून १८ लाखांचा माल घेतल्यानंतर पैसे न देता चिखली येथील एका व्यापाऱ्याची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना ९ जुलै ते २९ जुलै २०२५ दरम्यान राजे शिवाजी नगर, चिखली येथे घडली.
याप्रकरणी ४२ वर्षीय व्यापाऱ्याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कंपनीसाठी फिर्यादीकडून हळद खरेदी करण्याचा करार केला होता. या करारानुसार त्याने १८ लाख ३५ हजार २७८ रुपयांचा माल घेतला, मात्र त्या बदल्यात केवळ ६ लाख ७० हजार रुपये दिले. उर्वरित ११ लाख ६५ हजार २७८ रुपये देण्यास नकार देऊन त्याने फिर्यादीची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करत आहेत.
मालकी हक्काच्या वादातून दोघांवर हातोड्याने हल्ला
जुन्या सांगवी परिसरात मालमत्तेच्या वादातून तिघांनी दोघांवर हातोड्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना बुधवारी (११ मार्च) दुपारी एक वाजताच्या दरम्यान ढोरे नगर, जुनी सांगवी येथे घडली.
या प्रकरणात हरिश श्याम ढोरे (४३, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण आत्माराम ढोरे, अभिजीत नारायण ढोरे यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढोरे नगर मधील एका इमारतीमध्ये फिर्यादी यांची सदनिका आहे. या सदनिकेची साफसफाई करण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचे वडील गेले होते. त्यावेळी आरोपींनी तिथे येऊन जागेच्या मालकी हक्कावरून भांडण केले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
गांजा विक्री प्रकरणी एकास अटक
अंमली पदार्थ विरोधी पथकाने चऱ्होली परिसरात छापा टाकून गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (११ मार्च) मध्यरात्री आझादनगर येथील एका पान शॉपसमोर करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस शिपाई चंद्रकांत जाधव यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेंद्र विष्णू आदुडे (३९, दाभाडे वस्ती, चऱ्होली; मूळ गाव छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली असून एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र हा रस्त्याच्या कडेला सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्रीसाठी उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याकडून २२ हजार ८०० रुपये किमतीचा २४० ग्रॅम गांजा, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत हा गांजा त्याने पिंपरीतील एकाकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले. दिघी पोलीस तपास करत आहेत.
