पिंपरी : “माझ्या बायकोची बदनामी करतोस” असे म्हणत एका व्यक्तीच्या डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केले. ही घटना खेड तालुक्‍यातील मेदनकरवाडी येथे गुरुवारी घडली. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी मित्रांसोबत बसले असताना आरोपी तेथे आला. त्याने शिवीगाळ करत फिर्यादीच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. दक्षिण चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

जादा परताव्याचे आमिष; गृहिणीची ५० लाखांची फसवणूक

व्यवसायातील गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका गृहिणीची तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपळे निलख येथे घडली. याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जानेवारी २०२३ पासून आरोपींनी फिर्यादींना गुंतवणुकीवर जादा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार वेळोवेळी मोठी रक्कम घेतली. मात्र कोणताही परतावा न देता ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

‘डिजिटल अरेस्ट’ची भीती; ५५ लाखांचा गंडा

मनी लॉन्ड्रिंग व ड्रग्ज प्रकरणात अटक होईल, अशी भीती दाखवत सायबर भामट्यांनी भोसरीतील एका व्यक्तीची ५५ लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना १० मे ते ३ जून या कालावधीत घडली.

याप्रकरणी अज्ञात सायबर आरोपींविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीने गुरुवारी रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवले. व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून आधार क्रमांक गुन्ह्यात वापरल्याचा बनाव केला. त्यानंतर बनावट कागदपत्रे पाठवून विश्वास संपादन केला. चौकशीसाठी रक्कम जमा करण्यास सांगून विविध बँक खात्यांमध्ये ५५ लाख रुपये भरायला लावले. सायबर पोलीस तपास करीत आहेत.

महेशनगरात प्रतिबंधित गुटखा साठ

शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित पानमसाला व गुटख्याची विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील महेशनगर परिसरातील एका पानटपरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी करण्‍यात आली आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी सायली शंकर टाव्हरे (वय ३३) यांनी रोजी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी आरोपीच्या टपरीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व गुटखा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत तुकारामनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.