पिंपरी : पोलीस महासंचालकांशी ओळख असल्याची बतावणी करून मुलाला पोलीस दलात नोकरीला लावतो असे आमिष दाखवून एका व्यक्तीची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना जुलै २०२४ ते शुक्रवार (दि. १३) या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली. या प्रकरणी ५८ वर्षीय व्यक्तीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपली ओळख पोलीस महासंचालकांशी असल्याचे सांगून फिर्यादीच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. गुगल पे द्वारे टप्प्याटप्प्याने सहा लाख रुपये घेऊन फसवणूक केली. पैसे परत मागितले असता आरोपींनी फिर्यादीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि वाईट परिणामांची धमकी दिली. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील करत आहेत.
पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावून झटापट
चिंचवड येथील संभाजीनगर भागात एका पादचाऱ्याचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्याला पकडल्यानंतर त्याने लोखंडी हत्याराने फिर्यादीला जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवार सकाळी नऊच्या सुमारास संभाजीनगर कमानीजवळ घडली. या प्रकरणी शुभम शरद शिंदे (वय २२ वर्षे, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जॉर्डन राजू साळवे (वय २० वर्षे, रा. चिखली) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम हे पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या आरोपी जॉर्डनने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला. फिर्यादीने पाठलाग करून आरोपीला पकडले असता, आरोपीने त्याच्याजवळील टायर पंक्चर काढण्याच्या लोखंडी टूलने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बोटावर मारहाण करून दुखापत केली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.
मोशीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
मोशी गाव चौक येथे भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पुणे-नाशिक हायवेवर घडली. याप्रकरणी गोविंद प्रकाश गायकवाड (वय ३३ वर्षे, रा. मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ट्रक चालक बिलाल अस्लम बारुदवाले (वय २१ वर्षे, रा. लातूर) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे दाजी भगवान सिद्धार्थ साखरे हे आपल्या दुचाकीवरून कामासाठी जात असताना, पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात साखरे हे रस्त्यावर पडले आणि ट्रकचे चाक त्यांच्या पोटावरून गेल्याने त्यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक पानसरे तपास करत आहेत.
वाकडमध्ये हप्ता वसुलीवरून रिकव्हरी एजंटची तरुणाला मारहाण
कर्जाचे हप्ते थकल्याच्या कारणावरून एका रिकव्हरी एजंटने तरुणाला लाथाबुक्यांनी आणि हातातील कड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी डांगे चौक, वाकड येथे घडली. या प्रकरणी २५ वर्षीय तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिकव्हरी एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र गप्पा मारत उभे असताना आरोपी तिथे आला आणि त्याने लोनचे हप्ते का भरत नाहीस असे म्हणून शिवीगाळ सुरू केली. आरोपीने त्याच्या हातातील कड्याने फिर्यादीच्या डोक्यात मारून दुखापत केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडकर करत आहेत.
चाकणमध्ये जुगारावर छापा; तिघांविरुद्ध कारवाई
चाकण येथील तळेगाव चौकातील एका पत्रा शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई सुनील गोविंद भागवत यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक आरोपी हा इतर दोघांकडून पैसे घेऊन जुगार खेळवत असताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळावरून २ हजार ८५० रुपयांचे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सांगिडवार करत आहेत.
