धक्कादायक! कानशिलात लगावली, म्हणून केला मित्राचा खून; ‘गोल्डमॅन’च्या मुलाला अटक!

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त कानशिलात लगावली म्हणून एका मित्राचा तिघा मित्रांनी मिळून कोयत्याने वार करत खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

pimpri chinchwad murder case arrest
प्रातिनिधिक छायाचित्र

पार्टीनंतर दारूच्या नशेत कानशिलात लगावली, म्हणून “भाईला का मारलं?” असं म्हणत तीन मित्रांनी आपल्याच मित्राचा कोयत्यानं वार करत खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. सोमवारी ही हत्या झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास लावण्यास सुरुवात केली. हा अनैतिक संबंधांचा प्रकार असल्याचं आधी पोलिसांना वाटलं. मात्र, नंतर सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण आपल्याच मित्रावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करणाऱ्यांमध्ये त्यांच्याच एका अल्पवयीन मित्राचा देखील समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा मित्रांना अटक केली आहे.

नेमकं झालं काय?

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी येथे एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना सोमवार रोजी उघडकीस आली होती. भोसरी येथील विठ्ठल मंदिरा जवळ अज्ञात तरुणाचा खून झाल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली होती. तातडीने घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पाहणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस कसून तपास करत होते. अगोदर हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय पोलिसांना होता. परंतु, तपासाला वेगळं वळण लागलं. या सर्व प्रकरणामधला ‘भाई’ हा आता हयात नसलेले ‘गोल्डमॅन’ दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम फुगेच असल्याचं देखील पोलिसांच्या लक्षात आलं.

त्या रात्री काय घडलं?

आरोपी शुभम फुगे, प्रथमेश वायकरसह अल्पवयीन मुलगा आणि खून झालेला तरुण अमन सुरेश डांगळे हे सर्व मित्र होते. रविवारी रात्री शुभम फुगेच्या टेरेसवर दारूची पार्टी झाली. सर्व जण दारूच्या नशेत होते. तेव्हाच, मयत अमन आणि शुभममध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अमनने शुभमच्या कानशिलात लगावली. इतर मित्रांनी “शुभम भाईला का मारलं?” असा प्रश्न विचारत अमनला टेरेसवरून खाली आणलं. रागात असलेल्या शुभमनं तिथे पाठीमागून येत अचानक अमनवर कोयत्याने वार केले.

अमन मेल्यानंतरही केले वार!

दरम्यान, या हल्ल्यामध्ये अमनचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्यांच्यापैकी एक अल्पवयीन मित्र आणि दुसरा प्रथमेश वायकर या दोघांनी पुन्हा अमनवर कोयत्याने वार केले. या घटनेप्रकरणी भोसरी पोलिसांनी शुभम फुगे याच्यासह त्याच्या मित्रांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त मंचक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांच्या पथकाने केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pimpri chinchwad crime news friend murdered for slapping another goldmans son arrested kjp 91 pmw

ताज्या बातम्या