पिंपरी : येरवडा कारागृहात ज्युनिअर क्लार्क आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून दोन महिलांची सात लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १५ जुलै २०२१ ते १६ जुलै २०२५ दरम्यान किवळे येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला येरवडा जेल विभागात ज्युनिअर क्लार्क पदावर आणि तिच्या मैत्रीणीला सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सरकारी नोकरी लावण्याचे प्रलोभन दिले. यासाठी आरोपीने वेळोवेळी त्यांच्याकडून एकूण सात लाख ४५ हजार ५०० रुपये घेतले. नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. रावेत पोलीस तपास करत आहेत.
मारहाणीत दुचाकीस्वाराच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर
रस्त्यावर मोटार आडवी का घातली याचा जाब विचारल्याच्या रागातून दोघांनी एका दुचाकीस्वाराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात दुचाकीस्वाराच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. ही घटना शुक्रवारी (१ मे) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई हायवेवर देहूरोड येथे घडली.
याप्रकरणी ४८ वर्षीय व्यक्तीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून देहूरोडहून शेलारवाडीला जात होते. त्यावेळी आरोपीने आपली मोटार अचानक डिव्हायडर क्रॉस करून हायवेवर आणली. फिर्यादीने मोटार अचानक मध्ये का घातली असा जाब विचारला असता, मोटारीमधील दोघांनी खाली उतरून त्यांना शिवीगाळ व मारहाण केली. यातील एकाने फिर्यादीच्या नाकावर जोरात बुक्का मारल्याने त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. देहूरोड पोलीस तपास करत आहेत.
पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
बेकायदेशीररीत्या पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवार (३ मे) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील बस स्टॉप जवळ करण्यात आली.
या प्रकरणात पोलीस हवालदार आशिष बनकर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक अशोक भंडारी (२७, धनकवडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील बस स्टॉपजवळ एक तरुण संशयितपणे थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती सांगवी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. अभिषेक याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शस्त्र जप्त केले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
पवना नदीकाठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८०० लिटर रसायन जप्त
पुसाणे गावच्या हद्दीत पवना नदीच्या बाजूला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीचे मद्य तयार करण्यासाठी भिजत घातलेले कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई रविवार (३ मे) रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राठोड यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत हातभट्टी लावली जात होती. पोलिसांनी छापा टाकला असता तिथे मद्य तयार करण्यासाठी लागणारे ८०० लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन आढळून आले. पोलिसांनी २८ हजार ८०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
शिरगाव येथे पावणे तीन लाखांचे दारूचे रसायन नष्ट
शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू तयार करण्याचा प्रयत्न शिरगाव पोलिसांनी हाणून पाडला. ही कारवाई रविवारी (३ मे) सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल चितारे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून ती सध्या फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पवना नदीच्या पात्राजवळ बेकायदेशीरपणे ८ हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन दारू तयार करण्यासाठी भिजत घातले होते. जप्त केलेल्या या रसायनाची एकूण किंमत २ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. पोलीस पथक येताच महिला आरोपी तेथून पळून गेली. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.
