पिंपरी : पत्नीच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाल्याने संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ ऑगस्टच्या पहाटे खेड परिसरात घडली.
याबाबत मुलीच्या वडिलांनी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मयत मुलीचे एकाबरोबर प्रेमसंबंध होते. त्याची माहिती तिच्या पतीला मिळाली. यावरून संतापलेल्या पतीने गळा आवळून पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. दक्षिण म्हाळुंगे पोलीस करीत आहेत.
डोक्यात मारून तरुणाचा खून
एका अनोळखी तरुणाचा डोक्यात व हनुवटीवर कशाने तरी मारहाण करून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी मारूंजी येथे घडली. या प्रकरणात सुयश गजानन बुचडे (वय ४०, रा. सिद्धिविनायक नगर, मारूंजी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारूंजी येथील प्लॉटिंगमधील पत्र्याच्या शेडजवळ ३५ वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी आढळून आला. कोणत्यातरी अज्ञात कारणावरून आरोपीने त्याच्या हनुवटीवर आणि डोक्यात गंभीर वार करून त्याचा खून केला. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
दुकानदाराकडे खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक
किवळे येथील सुपर मार्केटमध्ये जाऊन दुकानाचा हप्ता म्हणून पाच हजार रुपयांची खंडणी मागणार्या आणि न दिल्यास दुकान चालू न देण्याची धमकी देणार्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना ११ ते १२ ऑगस्टद रम्यान घडली.
या प्रकरणात पांडुरंग तुकाराम साळुंखे (वय ३२, रा. तक्षशिला बुद्धविहाराजवळ, देहूरोड) आणि पवन अभिमान पौळ (रा. स्वारगेट, पुणे) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दुकानदाराने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी किवळे येथील फिर्यादीच्या सुपर मार्केटमध्ये जाऊन दुकानदाराकडे पाच हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास दुकान बंद पाडू आणि बघून घेऊ, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने आरोपींना साडेतीन हजार रुपये रोख आणि दीड हजार रुपये पेटीएमद्वारे ऑनलाइन असे एकूण पाच हजार रुपये दिले. या प्रकरणाचा पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.
